२-१०-१९३० देशाच्या स्वराज्यास माझा पाठिंबा असेल - Page 275

देशाच्या 'स्वराज्यास माझा पाठिबा असेल २३३

अमेरिका, जर्मनी इत्यादी साऱ्या देशभर होत आहे. तद्वतच आपल्या अस्पृश्यतेचे दु:ख परक्यांच्या वेशीवर टांगले पाहिजे व म्हणून रशिया, जर्मनी, अमेरिका व जपान इत्यादी देशातील प्रमुख पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन आपले दुःख त्यांचेपुढे मांडीन. इतकेच नव्हे तर, जुळल्यास लीग ऑफ नेशन्सपुढेही अस्पृश्यांचा प्रश्‍न मांडणार आहे. तसेच अस्पृश्यांना सध्या पोलीस व लष्करी नोकरीत मज्जाव आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करीन. मला आपणा सर्वांना शेवटची एकच विनंती करावयाची आहे व ती ही की, आपण सर्वांनी एकोप्याने व ऐक्यानी वागण्याचा प्रयत्न करावयास हवा आहे. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडले आहेत. गेल्या दोन चार वर्षात एक अगदीच वाईट दृश्य माझ्या नजरेस पडले व ते हे की, दरेक मनुष्य स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो ही फार वाईट गोष्ट आहे. यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्यापुढे इतक्या अडचणी व कामाचे इतके डोंगर पडले आहेत की, त्यांचे निवारणार्थ एक जिल्हा किंवा एक इलाखा सुद्धा काही करू शकणार नाही. तेव्हा अखिल बहिष्कृत बंधुंनी आपापसातील मतभेद बाजूला सारून खांद्यास खांदा लावून कार्यास लागावे, यातच आपले हीत आहे. माझ्या मागे डॉ. सोळंकी व श्री. नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीस लागण्याचे कार्य आपणा सर्वावर सोपवून आपली रजा घेतो." "

“ हे विचार डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. सभा संपल्यानंतर अस्पृश्य लोक तेथून बाहेर पडले, तेव्हा बाहेर जमलेल्या काही लोकांनी अस्पृश्यांवर हल्ला केला असे म्हणतात. परेल येथे अस्पृश्य व काँग्रेसच्या पक्षाचे लोक यांच्या दरम्यान बरीच मोठी मारामारी झाली. तीत दगड व लाठ्या यांचा उपयोग करण्यात आला. दंग्यात ८ माणसे जखमी झाली व त्यांना जवळच असलेल्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी

पाठविण्यात आले. “२

१ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र: चां. भ. खैरमोडे, खंड ४, पृ. ६६-६९

२ ज्ञानप्रकाश : ४ ऑक्टोबर १९३०