३५
ब्रिटिश सरकार जोपर्यत या देशात आहे
आमच्या हातात राजकीय सत्ता येणे शक्य नाही
( प्रथम गोलमेज परिषद १९३० ला लंडन येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरांनी २० नोव्हेंबर १९३० ला केलेले पहिलेच भाषण अनेक अर्थानी क्रांतीकारक ठरून इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी त्याची विशेष दखल घेतली.- संपादक. )
डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
अध्यक्ष महोदय,
मी आणि माझे सहकारी रावबहादूर श्रीनिवासन् दलित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून येथे हजर झालेलो आहोत. यास्तव भारतीय राज्यघटनेच्या नविनीकरणासंबंधी विचार करीत असता तत्त्वतःच मी दलित वर्गाचा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून भाषणास उभा झालो आहे. या वर्गाचे प्रतिनिधीत्व करणे हा मला व माझ्या सहकाऱ्यास सन्मान वाटतो. हा दृष्टिकोन चारकोटी तीस लक्ष लोकांचा किवा इंग्रजी अमलाखालील भारतीय लोकांपैकी एक पंचमांश लोकांचा आहे. हा दलित लोकांचा वर्ग स्वतंत्र वर्ग असून स्पष्टपणे मुसलमान वर्गापासून तो निराळा आहे. आणि हिंदू समाजात जरी त्याचा समावेश करण्यात येत असला तरी तो कोणत्याही दृष्टीने त्या समाजाचा एकजीव घटक नाही. दलित समाजाचे केवळ स्वतंत्र अस्तित्व आहे, इतकेच नाही तर हिंदुंनी त्यांचा द्वेषभावनेने वेगळा असा सामाजिक दर्जा ठरवून टाकला आहे. हा दर्जा हिंदू समाजातील दुसऱ्या कोणत्याही जातीपेक्षा ठळकपणे वेगळा आहे. हिंदूत ज्यांना दुय्यम व खालच्या दर्जाचे स्थान प्राप्त झालेले आहे अशा काही जाती आहेत, परंतु दलित वर्गाला देण्यात आलेला दर्जा पूर्णत: वेगळा आहे. त्याला भूदास आणि गुलाम यांच्या मधली स्थिती प्राप्त झाली आहे. भूदास आणि गुलाम यांना स्पर्शबंदी घालण्यात आली नव्हती परंतु दलित वर्गावर स्पर्शबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गुलौम आणि भूदास यांच्यापेक्षाही दलितांची स्थिती फारच शोचनीय झाली आहे. यामुळे भयंकर वाईट गोष्ट कोणती झाली असेल तर त्यांच्यावर गुलामगिरी लादल्या गेली आणि त्यांच्या मानवी व्यवहारात मर्यादा घातल्या गेल्या. केवळ त्यांच्या सार्वजनिक जीवनावरच या अस्पृश्यतेचा परिणाम होतो असे नाही तर तीमुळे प्रत्यक्षात त्यांना संधी समानतेपासून वंचित केल्या जाते ;