२३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दूर करण्यास कोणीही समर्थ नाही अशी आमची खात्री झाली आहे. आमची दुःखे आम्हीच नाहीशी करु शकू. यासाठी जोपर्यंत आमच्या हातात राजकीय सत्ता येत नाही तोपर्यंत आम्ही ती नष्ट करू शकणार नाही. ब्रिटिश सरकार जोपर्यंत या देशात आहे तोपर्यंत निश्चितच राजकीय अधिकारांचा अंशही आमच्या हाती येण्याची शक्यता नाही. केवळ स्वराज्यातील राज्यघटनेतच राजकीय सत्ता आमच्या हातात येण्याची संधी मिळणे शक्य आहे. त्याशिवाय आमच्या लोकांची मुक्तता दुसऱ्या मार्गाने होणे शक्य दिसत नाही.
अध्यक्ष महोदय, तुमचे विशेष लक्ष जिच्याकडे मी वेधू इच्छितो अशी आणखी एक गोष्ट आहे. दलित वर्गाचा दृष्टिकोन तुमच्यापुढे मांडत असताना स्वयंसत्तात्मक दर्जाचे राज्य असा शब्दप्रयोग मी आतापर्यंत केलेला नाही. मी तो वापरण्याचे टाळले याचे कारण त्यातील गर्भितार्थ मी ओळखत नाही असे नव्हे किंवा भारताचा दर्जा स्वयंसत्तात्मक राज्याचा व्हावा याला दलितांचा विरोध आहे असाही त्याचा अर्थ नाही. हा शब्दप्रयोग न वापरण्याचा माझा मुख्य हेतू असा आहे की, त्यामुळे दलित वर्गाची भूमिका या शब्द प्रयोगातून पुर्णत्वाने स्पष्ट होत नाही. दलित वर्गाकरिता असलेल्या संरक्षणात्मक तरतुदीसहित स्वयंसत्तात्मक दर्जाचे राज्य दलितांनाही हवे आहे ; तथापि त्यांचा भर मुख्यतः एकाच मुद्यावर आहे : तो मुद्दा म्हणजे स्वयंसत्तात्मक दर्जा असलेल्या भारताचा राज्यकारभार कोणत्या तत्त्वांनुसार चालणार आहे ? राजकीय सत्तेचे केद्र कुठे राहील ? ते कोणाच्या हातात राहणार आहे? त्यामध्ये दलित वर्ग वारसदार असेल काय? या उद्देश पूर्तीसाठी आवश्यक अशा नवीन राज्यघटनेची राजकीय यंत्रणा असल्याशिवाय दलितांना राजकीय सत्तेचा अल्पांशही मिळणे शक्य नाही असे दलितांना वाटते. ही यंत्रणा घडविताना भारताच्या सामाजिक जीवनातील काही कठोर सत्यांकडे डोळेझाक करून चालणार नाही. हे मान्य करावेच लागेल की भारतीय समाज हा विविध जातींच्या उतरंडीने बनलेला आहे. ह्या समाजरचनेत वरच्या क्रमाने सन्मान व उतरत्या क्रमाने अवमान अशी एक, जातीय श्रेणी निर्माण झाली आहे. लोकशाही शासनासाठी अत्यावश्यक अंग म्हणजे समता आणि बंधुभाव या भावना विकसित होण्यास मुळीच अवसर न देणारी अशी ही समाजपद्धती आहे. दुसरी लक्षणीय बाब म्हणजे आपण हेही मान्य केलेच पाहिजे की, बुद्धिमान वर्गाला भारतीय समाजात फार महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे , परंतु हा वर्ग केवळ वरच्या भ्रेणीतूनच आलेला आहे. हा वर्ग जरी देशाविषयी बोलत असला आणि राजकीय चळवळीचे नेतृत्व करीत असला तरी ज्या जातींमध्ये तो जन्माला आला तिच्यासंबंधीचा संकुचित जातीय दृष्टिकोन त्याने झुगारून दिलेला नाही. दुसऱ्या शब्दात हे सांगायचे म्हणजे समाजाची मानसिकता आणि राजकीय यंत्रणा यांचा परस्पर संबंध असावयास हवा. आणि