२०-११-१९३० ब्रिटिश सरकार जोपर्यंत या देशात आहे, आमच्या हातात राजकीय सत्ता येणे शक्य नाही - Page 282

२४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भूमिकेची कारणमीमांसा अतिशय स्पष्ट आहे. सर्वानाच माहीत असलेले एक व्यावहारिक सत्य म्हणजे स्वामित्वहीन व्यक्तीपेक्षा स्वामित्व असलेली व्यक्ती केव्हाही प्रबळ असते - तसेच स्वामित्वहीनाच्या फायद्यासाठी कोणी आजचे स्वामित्व सोडून देण्याची उदाहरणे क्वचितच आढळतात. म्हणूनच आमची ही सामाजिक समस्या पुढे फलदायक रीतीने सुटेल अशी आम्ही आशा करूच शकत नाही. आज हा प्रश्‍न सामोपचाराने न सोडवता जर आम्ही त्यांच्या हातात सहजगत्या सत्ता जाऊ दिली तर ज्या लोकांना राज्यावर व प्रतिष्ठेच्या जागी बसविण्यासाठी आज आम्ही मदत करीत आहोत त्यांनाच गादीवरून खाली खेचण्यासाठी आम्हास आणखी दुसरी एक क्रांती घडवून आणावी लागेल. या यंत्रणेचा अनिर्बंध ताबा ज्यांना मिळणार आहे त्यांच्या मर्जीवर आम्हाला आमचे प्रश्‍न सोपवायचे नाहीत. या अती साशंकतेबद्दल कोणी आम्हाला दुषण दिले तरी चालेल, कारण प्रचंड विश्‍वासाने दिलेल्या हमीतून ध्वस्त होण्यापेक्षा दुषण केव्हाही बरे । म्हणून आमचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राज्यसत्तेवर आमचाही हक्क असावा हाच एक न्याय्य व योग्य मार्ग आहे असे मला वाटते. शासन यंत्रणेतच अशातऱ्हेची व्यवस्था करून ठेवणे हाच एक यावर उत्तम तोडगा आहे. ही शासनसत्ता केवळ आपल्याच एकट्याच्या हाती अनियंत्रितपणे यावी म्हणून जे लोक निकराचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या लहरीवर हा प्रश्न सोपवून देण्याने तो कदापिही सुटणार नाही.

राज्ययंत्रणेमध्ये दलित वर्गाच्या संरक्षणाच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना कोणती तडजोड हवी आहे ते योग्य वेळी ह्या परिषदेपुढे मी मांडणार आहे. आम्हाला उत्तरदायी सरकार हवे असले तरी ज्यात केवळ आमचे मालक बदलल्या जातील असे सरकार आम्हास नको. शासक वर्ग जबाबदार असावा असे तुम्हास वाटत असेल तर कायदे मंडळ खऱ्या अर्थाने आणि पूर्णतः प्रातिनिधीक असले पाहिजे एवढेच आज या प्रसंगी मी सांगतो.

अध्यक्ष महोदय, अशातन्हेच्या स्पष्ट शब्दात मला बोलावे लागले याबद्दल मला दुःख होत आहे. परंतु याशिवाय मला तरी दुसरा पर्याय दिसत नाही. दलितवर्गाला कोणी मित्र उरलेला नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सध्याच्या सरकारने आतापर्यंत त्यांना केवळ सबबी सांगून त्यांचा दुरूपयोग करून घेतला आहे. तसेच दूर सारण्यासाठीच हिंदुंनीही त्यांना जवळ केले आहे. किवा अधिक स्पष्ट सांगायचे म्हणजे हिंदू त्यांना अधिकारापासून पूर्णतः वंचित ठेवू इच्छितात. आपल्या विशेषाधिकारांमध्ये वाटेकरी नकोत म्हणून मुसलमान त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच अमान्य करतात. म्हणजे शासनाने दुर्बल केलेला, हिंदुनी दाबून टाकलेला आणि मुस्लिमांनी अवमानित केलेला हा वर्ग आहे. इतकी असह्य आणि असहाय परिस्थिती असलेला वर्ग अन्यत्र कुठेही नसेल याबाबत माझी खात्री आहे. आणि म्हणूनच मला आपले लक्ष याकडे वेधून घेणे भाग पडले आहे.