MR/Khand_18_1 - Page 29

त्यांच्याच विचारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे याची जाणीव अनेक विचारवंतांना झाली आहे, होत आहे. दिवसेंदिवस त्या विचारांची गरज भासत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील विषयांचा आवाका प्रचंड होता. अस्पृश्यांना मानवी जीवन प्राप्त करून देणे ; दलित, शोषित व वंचितांना आपल्या भविष्यातील लढे उभारण्यासाठी प्रेरणा देणे ; देशातील सामाजिक, राजकीय प्रवाहात त्यांना सामील करून त्यांचे अधिकार मिळवून देणे ; बहुजन समाजाला धार्मिक गुलामीतून मुक्त करणे ; राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मार्गांचा स्वीकार करण्याचे आवाहन करणे व देशाच्या विकासाच्या ` नवीन दिशा शोधणे इत्यादी एक ना अनेक विषय त्यांनी आपल्या भाषणातून हाताळले याची प्रचिती या खंडातील भाषणांमधून पदोपदी येते. मानवी जीवनाशी संबंधित, मानवी जीवनाला आकार देणाऱ्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विषयांवर आपल्या जीवनात विविध प्रसंगी त्यांनी भाषणे दिलीत. सर्व धर्मांचा साकल्याने अभ्यास करून संपूर्ण मानव जातीला कोणता धर्म कल्याणकारक ठरू शकेल हे केवळ सांगून थांबणारा नव्हे, तर त्या दिशेनी पाऊल टाकणारा एक कृतिशील धर्मज्ञ, अमानवी विचारांवर तुटून पडणारा आणि त्या विचारांच्या जागी स्वातंत्र्य. समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची प्रत्यक्षात प्रस्थापना करणारा महान समाज क्रांतिकारक, भारताच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करणे योग्य होईल हे सांगणारा नाणावलेला अर्थतज्ञ, राजकीय जीवनात 'एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य' आणि राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रुपांतर झाले पाहिजे हे स्वतः प्रमुख शिल्पकार असलेल्या संविधानाच्या माध्यमातून आग्रहाने प्रतिपादन करणारा राजकीय विचारवंत, प्रसंगी स्वतःच्या समाजहिताचा बळी देऊन देशहिताला प्राधान्य देणारा थोर राष्ट्रभक्त, भारताला आवश्यक शैक्षणिक धोरणाचा मूलतः विचार करून वंचितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा थोर शिक्षणतज्ञ अशा विविध जीवनस्पर्शी पैलूंनी साकारलेले डॉ. आंबेडकरांचे विलोभनीय व्यक्तिमत्व प्रस्तुत खंडाच्या माध्यमातून वाचकांसमोर उभे राहणार आहे. समाज परिवर्तनाच्या संघर्षात सहभागी असणाऱ्या आणि होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यासाठीच केवळ नव्हे तर भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडणाऱ्या, तशी आस्था मनात जोपासणाऱ्या सर्व

` भारतीयांसाठी या खंडात अंतर्भूत भाषणातील विचार दीपस्तंभाप्ठमाणे मार्गदर्शक ठरतील असा ठाम विशवास आहे.

(पंचवीस)