या कार्यालयानी या खंडाचे काम पाहण्याची जबाबदारी प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. डॉ. एम. एल. कासारे आणि एन. जी. कांबळे या संपादक मंडळावर सोपविल्यावर त्यांनी विविध वत्तपत्रे, नियतकालिके आणि ग्रंथांतून १७१ नवीन भाषणे शोधून या खंडात समाविष्ट केली आहेत. खंडातील एकूण भाषणांची संख्या आता ३५१ आहे. यातील काही भाषणे विविध परिषदेत, अधिवेशनात झालेली आहेत. त्या परिषदेच्या, अधिवेशनाच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काही प्रसंगी आपले थोडक्यात विचार व्यक्त केले आहेत. त्यांना स्वतंत्र भाषणाचे स्वरुप न देता मुख्य भाषणाच्या पार्श्वभूमीमध्ये त्यांचा अंतर्भाव . केला आहे.
प्रस्तुत खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच प्रकाशित भाषणांचा समावेश नाही याची संपादकांना जाणीव आहे. ती मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातील काही मिळू शकली नाही याचा खेद आहे. जर कुणाजवळ या व्यतिरिक्त भाषणे असल्यास त्यांनी ती या कार्यालयास उपलब्ध करून द्यावी जेणेकरून या खंडाच्या पुनर्मुद्रणाच्या वेळी त्यांचा समावेश करता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या वास्तव्यात आणि इतर ठिकाणीही आपले सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करीत असत तसेच त्यांना मार्गदर्शनही करीत असत. अशा काही प्रसंगांचा वृत्तांत वृत्तपत्रांमधून त्याकाळी प्रकाशित झाला. जरी सीमित लोकांपुढे हे विचार व्यक्त केल्या गेले तरी ते वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्याने त्याला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले आहे. अशा चर्चेचाही या खंडात अंतर्भाव केला आहे. अर्थातच ही संख्या फार कमी आहे.
काही भाषणे वृत्तांताच्या स्वरुपात प्रकाशित झाली होती. त्यांना भाषणाचे स्वरुप दिले आहे. काही अपवादात्मक प्रसंगी तसे करता आले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील महत्त्वपूर्ण भाषणांपैकी तीन भाषणांचा अंतर्भाव या खंडात केला आहे. त्यापैकी संविधानाचा गसुदा संविधान सभेला सादर करताना दिनांक ४ नोव्हेंबर १९४८ ला केलेल्या आणि २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या शेवटच्या भाषणांचा मराठी अनुवाद जनता पत्रात प्रकाशित झाला. तसेच १७ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेत त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचा वृतांत सारांश रूपाने जनतेत आला आहे. हे वृत्तांत याचबरोबर इतर उपलब्ध अनुवादांचेही संपादकांनी अवलोकन केले पण ते अपूर्ण असल्याचे जाणवले. त्यामुळे त्या भाषणांचा तसेच अशाच प्रकारच्या कारणांसाठी गोलमेज परिषदेतील त्यांच्या तीन भाषणांचा मराठी अनुवाद स्वतःच करावा असा निर्णय संपादकांनी घेतला. तो अनुवाद या खंडात अंतर्भूत केला आहे. इतर उपलब्ध अनुवादांच्या तुलनेत तो अधिक योग्य आहे अशी धारणा आहे.
(सव्वीस)