तऱ्हेवाईक देशभक्तांच्या वर्गापैकी मी एक नाही २४९
या दृष्टिकोनातून माझी विचारसरणी पूर्णतः स्पष्टपणे मांडण्याची जबाबदारी माझ्यावर येते. भावी राज्यघटनेत दलितांना देण्यात येणारे हक्क ज्याअर्थी अजून निश्चितपणे स्पष्ट केले नाही त्याअर्थी, प्रांत शासन त्याचप्रमाणे मध्यवर्ती शासन यांच्याकरिता जबाबदार शासनाची घटना ठरवित असताना ब्रिटिश सरकारने ती जाहीर करण्यापूर्वी ज्या लोकांच्या हातात सत्ता जात आहे त्यांना अटी घालून असा करार स्पष्ट करुन घेणे आवश्यक आहे की, जेणेकरुन दलित वर्गाच्या हितांचे आणि हक्कांचे वास्तविकरित्या संरक्षण होईल. वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मला अधिक जोर देऊन तुमच्या नजरेस आणून देणे क्रमप्राप्त आहे की, ही बाब पूर्णपणे स्पष्ट करुन त्याची सोडवणूक केल्याशिवाय आणि त्यावर निर्णय दिल्याशिवाय कोणताही जाहीरनामा आम्ही मान्य करणार नाही. हे अमान्य झाल्यास मी आणि माझे सहकारी या परिषदेच्या पुढील कार्यवाहीत सहभागी होण्याची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ ठरू आणि आम्ही परिषदेशी असहकार करण्यास एकाप्रकारे भाग पडू. अध्यक्ष महोदय, असे सूचवित असताना तुम्ही आधीच दिलेल्या वचनापेक्षा मी अधिक काही मागतो आहे असे नाही. ब्रिटिश लोकसभा आणि जे लोक तिच्या बाजूने बोलतात ते नेहमीच म्हणत आलेले आहेत की, ते दलित वर्गाचे विश्वस्त आहेत. आणि मानवी संबंध शक्य तितके आनंददायक राहावेत म्हणून आपण नेहमी उच्चारीत असतो, अशाप्रकारच्या संस्कृतिमान्य शिष्टाचाराच्या थापापैकी ही काही एक थाप नव्हे अशी माझी खात्री आहे. म्हणून माझ्या दृष्टीने कोणत्याही सरकारचे हे आद्य कर्तव्य आहे की ह्या विश्वासाचा कोणत्याही प्रकारे घात होऊ नये हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. माननीय प्रधानमंत्री, मी आपणास असे सांगू इच्छितो की, ज्यांचा उत्कर्ष आणि ज्यांचे श्रेष्ठत्व केवळ आमच्या पूर्ण विध्वंसावर आणि अवनतीवरच आधारलेले आहे, ज्यांनी आमच्या कल्याणाची स्वप्नातही आस्था बाळगली नाही, त्यांच्या दयेच्या भिकेवरच आम्हाला जर ब्रिटिश सरकार सोपविणार असेल तर ब्रिटिश सरकारने आमच्याशी भयंकर विश्वासघात केला, असेच आम्ही समजू.
असे बोलल्यामुळे भारतातील राष्ट्रवादी आणि देशभक्त मला जातीयवादी ठरवतील. मी त्याला घाबरत नाही. भारत हा एक तऱ्हेवाईक देश आहे आणि तेथील राष्ट्रभक्त व देशभक्तही तऱ्हेवाईक लोक आहेत. भारतीय राष्ट्रभक्त व देशभक्त असा आहे की जो आपल्या देशबांधवांना माणसापेक्षाही नीच वागणूक मिळत असताना देखील उघड्या डोळ्यांनी पाहतो तो. परंतु त्याची मानवता त्याविरूद्ध कधीच निषेध व्यक्त करीत नाही. पुरुष आणि स्त्रियांना काहीही कारण नसताना मानवी अधिकार नाकारण्यात आलेले आहेत हे या देशभक्ताला माहीत असते, परंतु कृतिशील मदत करण्याच्या दृष्टीने त्याची नागरी संवेदना जागृत होत नाही. लोकांचा एक मोठा वर्ग सार्वजनिक उद्योगधंद्यात येऊ दिला