२५४ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
शेवटी वरील सर्व गोष्टींचा विचार करता हिंदुस्थानला मिळणाऱ्या भावी स्वराज्यात अल्पसंख्याकांच्या अटी निश्चित झाल्याशिवाय कसल्याही प्रकारची नवी राज्यघटना फोल ठरणार आहे ; आणि यासाठी आपणास बहुजन समाजाचे समतेचे असे स्वराज्य प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तर वयात आलेल्या दरएक माणसाला मतदानाचा हक्क मिळण्याची खटपट करणे, हे होय । हा सार्वत्रिक मतदानाचा प्रश्न फारच महत्वाचा आहे ; आणि यासाठी माझी अशी प्रामाणिक समजूत आहे की, गरिबांचे जीवित सुरक्षित नाही ते स्वराज्य धोक्याचे होय.
यानंतर चालू महिन्यात नाशिक काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्त्याग्रहाला तनमनधने सहाय्य करण्याची कळकळीची विनंती करतो. आपल्या पाठीमागे येथील एकंदर परिस्थिती चिताजनक असताही माझ्या सहकारी मित्रमंडळीनी, अखिल भारतीय बहिष्कृत समाज सेवा संघ व डॉ. आंबेडकर सेवा दलाने जी जबाबदारीची कामगिरी बजाविली त्याबद्दल आभार प्रदर्शित केल्याशिवाय राहवत नाही.
डॉक्टर आंबेडकर यांच्या भाषणानंतर अध्यक्ष डॉ. सोळंकी यांचे भाषण झाले. त्यांनी डॉक्टर साहेबांनी विलायतेमध्ये भरलेल्या परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या वतीने किती जबाबदारीची कामगिरी केली याचे विवेचन केले. राऊंड टेबल परिषदेला गेलेल्या इतर प्रतिनिधींच्या गाठीभेटी घेतल्या ; त्यात त्यांनी डॉक्टरांच्या कामगिरीबद्दल व्यक्त केलेले धन्यतेचे व समाधानाचे उद्गार जाहीर केले. मध्यंतरी गुरुवर्य श्री. कृष्णराव केळुस्कर यांचे छोटेसे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात आपले उज्वल स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर हे आपले तेज युरोपात प्रकाशित करून तेथील मुत्सद्यांना चकित करूनच आले. त्यांनी केलेली कामगिरी फक्त अस्पृश्यवर्गातफेची नसून अखिल हिंदुस्थानतफची आहे. इश्वर त्यांना दीर्घायुषी करो.
शेवटी श्री. शिवतरकर यांनी अध्यक्ष, सभेस हजर असलेले पाहुणे, अस्पृश्य बंधुभगिनी व निरनिराळ्या सेवादलाचे जाहीररित्या आभार मानले आणि नाशिक मंदिर प्रवेश फंडाला मुसलमान बंधुंतफं मि. मनियार यांनी एकशेएक रुपयांची देणगी दिल्याचे जाहीर केले. नंतर डॉ. आंबेडकर सेवादलाचे सर्वाधिकारी श्री. शंकर वडवळकर यांचे स्फूर्तिदायक असे भाषण झाल्यावर डॉ. आंबेडकर यांना निरनिराळया संस्थांकडून हारतुरे अर्पण केल्यानंतर जाहीर सन्मानाचा हा समारंभ समाप्त करण्यात आला.