३९
सन्मानाच्या व नेटाच्या लढ्यातच
आपल्या चळवळीचे यश
मु. नारायणगाव, ता. जुन्नर येथे ता. २३ व २४ मे १९३१ रोजी पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते- खाली भरले होते. परिषदेस पुणे जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणाहून सुमारे पाच सहा हजार लोकसमुदाय जमला होता. मुंबईहून श्री. सी. ना. शिवतरकर, श्री. लोटेकर, शंकरराव श्रावण भोसले, श्री. आडरेकर व गणपतबुवा इत्यादी अस्पृश्य वर्गाचे पुढारी तसेच मुनशीशेठ, देविदास, श्री. रामचंद्र अनाजी, पा. बुडे, ऑनररी मॅजिस्ट्रेट व प्रेसिडेंट, ता. लो. बोर्ड, जुन्नर, श्री. दशरथ पांडुजी बनकर, में. डि. लो. बोर्ड, पुणे, श्री. गजानन रावजी पा. भुजबळ, व्हा. प्रेसिडेंट ता. लो. बोर्ड, जुन्नर, श्री. भिमाजी गेनूजी, पा. Was, श्री. डुंबरे, पाटे, खैरे, तांबे, शिंदे मिस्त्री, भुजबळ इत्यादि स्थानिक व पुण्याहून सुभेदार घाडगे, थोरात, गायकवाड, चौरे, चंदनशिवे, घोगरे, मधाळे, रणपिसे वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती. याशिवाय मांग व चांभार समाजातील प्रमुख मंडळींनी भाग घेतला होता.
प्रथम स्वागताध्यक्ष श्री. देवजी दगडूजी डोळस यांनी आपल्या भाषणात परिषदेस आलेल्या सर्व मंडळींचे आभार मानले. परिषद भरलेल्या गावाचे ऐतिहासिक महत्त्व सांगून बहिष्कृत समाजाची संघटना बळकट होण्यास जातीभेद प्रथम नाहीसा करण्याचा प्रयत्न व आपली आर्थिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न या दोन गोष्टीवरच विशेष विवेचन करून आपले भाषण थोडक्यात संपविले. स्वागताध्यक्षांच्या भाषणानंतर परिषदेचे जनरल सेक्रेटरी श्री. शां. अ. उपशाम यांनी परिषदेस आलेले शुभचितनपर संदेश वाचून दाखविले. रा. मा. शा. गायकवाड व रा. को. रा. मास्तर यांनी सूचना अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. अध्यक्षस्थान स्वीकारताच डॉ. आंबेडकरसाहेब आपल्या भाषणात म्हणाले, |
आपण मला आजच्या परिषदेचे अध्यक्षस्थान दिले, परंतु त्याचा स्वीकार करताना मला संकोच वाटतो. आज या सभेमध्ये आपले परमपूज्य पुढारी रा. कोंडाजी रामजी मास्तर हे हजर आहेत, त्यांच्याबरोबर काम करणारी इतर माणसेही दिसत आहेत. त्याशिवाय जी हजर नाहीत परंतु ज्यांनी माझे अगोदर पुष्कळ वर्षेपावेतो अस्पृश्य वर्गात नेटाने चळवळ केली होती अशी माणसे या जिल्ह्यात आहेत. मला आठवते की, मी मराठी चवथी इयत्तेत होतो
जनता : ८ जून १९३१.