२५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तेव्हा पुण्यात श्री. शिवराम जानबा कांबळे, थोरात, रामचंद्रराव कदम इत्यादी माणसे अस्पृश्यांसंबंधी कार्य करीत आहेत, असे माझे वडील सांगत. त्यापैकी श्री. थोरात आज प्रत्यक्ष येथे हजर आहेत. श्री. कांबळे व कदम आजच्या सभेस येऊ शकले नाहीत. अशी जुनी व वयोवृद्ध पुढारी मंडळी असता आजचा अध्यक्षपदाचा मान केवळ तुमच्या अत्याग्रहास्तव मला पत्करावा लागत आहे, असो. आता आपणाला सध्याच्या परिस्थितीत काय करावयाचे आहे याचा विचार अगोदर केला पाहिजे. आपण जरी अस्पृश्य मानले गेलो आहोत तरी आपण माणसे आहोत. इतर समाजाप्रमाणे आपणाला समानतेच्या दर्जाने राहता आले पाहिजे. आपण खऱ्या मानसन्मानाला पात्र असता इतर समाजाने आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आम्हाला उलट बहिष्कृत ठरविलेले आहे. हा देश काबीज करून घेण्याकरिता ज्या वीरांचे सहाय्य लागले ते बहुतेक सारे लढवय्ये वीर आपल्या समाजातले होते. महार सैनिकांच्या बळावर इंग्रजांना आपला येथला अंमल स्थिरावता आला आणि त्याबद्दलचे विजयाचे चिन्ह म्हणून इंग्रजांनी कोरेगावी विजयस्तंभ उभारून आपल्या समाजातील वीर पुरूषांची स्मृती कायम केलेली आहे. त्यावेळचा आपला दर्जा मात्र आज दृष्टोत्पत्तीस पडू शकत नाही. महारांच्या पराक्रमावर इंग्रजांना राज्य मिळाले खरे, परंतु देशातील इतर उच्चवर्णीय लोकांना खूष करण्याकरिता व महारादी अस्पृश्य समजलेल्या लोकांचा दुसरा कोणीच वाली नसल्यामुळे, इंग्रज सरकारने लष्करातील वरिष्ठ दर्जाच्या व इतर जागा महारांना देण्याची बंदी केली. आज अशी परिस्थिती आहे की. लष्करातील महार अधिकाऱ्यांच्या हाताखाली नोकरी करणे हलक्या वृत्तीचे समजणारे लोक मुसलमान अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्यास कोणतीच दिक्कत बाळगीत नाहीत. तीच गोष्ट पोलीस खात्यासंबंधी आहे. परंतु आपल्या गेल्या पाच सहा वर्षाच्या स्वावलंबीवृत्तीच्या चळवळीमुळे परिस्थितीत थोडाथोडा बदल होत चालला आहे. पोलीस खात्यात आपल्या समाजबंधुंना बऱ्याच सवलती मिळाल्याचे परवाच्या सरकारी पत्रावरून कळून येईल. आपण सर्वांनी यापुढे इतकेच लक्षात ठेवा की, आपणास इतर समाजामध्ये मोठा हुद्दा प्राप्त करून घ्यावयाचा नसून फक्त माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता हिंदुस्थानातील इतर दरिद्री म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा आपण अधिक दरिद्री आहोत. दारिद्र्य आपणास का प्राप्त झाले याचा विचार केल्यास ही अस्पृश्यतेची रूढीच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे, हे दिसून येईल. यासाठी ज्या उपायांनी आपणास आपला माणुसकीचा हक्क प्राप्त करून घेता येइल तो प्रत्येक मार्ग आपण संघटनेच्या बळावर आणि निर्भयपणे आक्रमण करा. नाशिक, पुणे वगैरे ठिकाणची सत्याग्रहाची शस्त्रे पाजळून आपला लढा यशस्वी करण्याची हिंमत बाळगा आणि असल्या सन्मानाच्या व नेटाच्या लढ्याने सर्वजण लढू लागलात तरच आपल्या चळवळीला यश प्राप्त व्हावयास फारसा कालावधी लागणार नाही.