MR/Khand_18_1 - Page 31

मूळ प्रकाशित भाषणांना गावाचे, परिषदेचे, दौऱ्याचे वगैरे शीर्षके देण्यात आली होती, जसे 'डॉ. आंबेडकरांचे निपाणी येथील भाषण', “नगरचे बातमीपत्र', “अखिल भारतीय दलित वर्ग परिषद', 'हिंदी समाज सुधारणा', 'इमारत फंडाची सभा'. अशा प्रकारची सर्व शीर्षके बदलवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या त्या भाषणाला अनुरूप शीर्षके देण्यात आली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या भाषणांनी इतिहास घडविला हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. ज्या परिस्थितीत ही भाषणे झालीत तिला एक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ आहे, मूल्य आहे. ज्याप्रसंगी त्यांनी भाषणे दिली ते सारे प्रसंग चळवळीचा, आंदोलनाचा अभिन्न भाग बनले आहेत. तो प्रसंग वस्तुनिष्ठपणे वाचकांच्या नजरेपुढे उभा राहाण्यासाठी भाषणांना पार्श्वभूमी देण्याचा धोरणात्मक निर्णय संपादक मंडळाने घेतला. ही पार्श्वभूमी देताना तिला सलग स्वरुप प्राप्त होण्यासाठी कधी कधी एखाद दुसरे वाक्य लिहिण्यापलिकडे संपादक मंडळाने आपल्या पदरचा एकही शब्द उपयोगात आणला नाही. प्रकाशित झालेल्या साहित्याचाच यासाठी उपयोग केला आहे आणि त्याचा स्त्रोतही दिला आहे. ज्या भाषणांची पार्श्वभूमी प्राप्त होऊ शकली नाही तिथे ती देता आली नाही. परंतु अशी भाषणे अपवादात्मक आहेत. भाषण प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रात काही भाषणांना पार्श्वभूमी मुळीच नव्हती तर काहींना ती त्रोटक स्वरुपात होती. ती इतरत्र शोधून तिचा संबंधित भाषणात अंतर्भाव केला आहे. काही भाषणात पार्श्वभूमीच्या अंतर्गत मानपत्र, पत्र, पत्रके आदी इंग्रजीत आहेत. त्यात तत्कालीन इंग्रजी लिहिण्याच्या प्रथेत कोणताही बदल न करता ती जशीच्या तशीच अंतर्भूत केली आहेत.

प्रस्तुत खंडाच्या संपादनाची जबाबदारी संपादक मंडळावर सोपविल्याच्या आधीपासून आज आमच्यात नसलेले डॉ. बाबासाहेव आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे विशेष कार्य अधिकारी वसंत मून यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या दुःखद निधनाने या खंडाच्या निर्मितीप्रक्रियेत प्रचंड पोकळी निर्माण झाली. संपादक मंडळाला ती सातत्याने जाणवत होती. या खंडाच्या निर्मितीतील त्यांचे योगदान मोलाचे आहे.

प्रस्तुत खंड पूर्णत्वास येण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे जेष्ठ सदस्य माननीय खासदार रा. सु. गवई यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा खंड मार्गी लागला.

(सत्तावीस)