२६० डॉ. वाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
संस्थांतून अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून फक्त महार जातीचेच लोक भरले आहेत हा आरोप आमूलाग्र खोटा व निराधार आहे. पोलीस खाते प्रत्यक्ष व्यवहारात अस्पृश्य समाजाला जवळ जवळ बंदच होते. कौन्सिलमध्ये गेल्यावर या प्रश्नाला मी व माझे सहकारी मित्र डॉ. सोळंकी यांनी चालना दिली व पोलीस खाते अस्पृश्यांना मोकळे होईल अशी खटपट केली. तिला यश येऊन पोलीस खाते अस्पृश्यांना खुले करण्यात आल्याचा सरकारी जाहीर ठराव नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या प्रयत्नानुसार वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकारावर जी पहिली नेमणूक झाली आहे ती चांभार जातीतील एका गृहस्थाची झाली आहे. महार जातीतील मनुष्याची वर्णी तेथे आम्हाला लावून घेता आली असती ; पण तसे मी केले नाही. अस्पृश्य वर्गात महार जात ही बहुसंख्यांक आहे. चांभारादी अल्पसंख्यांक जातीचा विश्वास संपादन करणे तिचे कर्तव्य आहे असे मी समजतो व म्हणून महार समाजातील लोकांचा रोष पत्करूनही ज्या काही सवलती मिळतील त्यांच्यातील मोठा हिस्सा चांभारादी अस्पृश्यातील अल्पसंख्यांक जातींना मिळेल अशी मी खबरदारी घेतो. 'गोळीला महार व पोळीला चांभार' असे माझे याबाबतीत धोरण आहे असे म्हणून माझ्यावर टीका करणारे व रागावणारे महार जातीत पुष्कळ लोक आहेत, हे मला माहीत आहे. माझ्याविरूद्ध त्यांचा हाच एक मोठा आक्षेप आहे ! अशी वस्तुस्थिती असता मी महारांनाच सर्व मलिदा चारतो व चांभारादी अल्पसंख्यांकांना काही मिळू देत नाही असा माझ्यावर आरोप करणे अत्यंत
नीचपणाचे व निराधार आहे. चांभारातील जबाबदार समजल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांनी असले वृथा आरोप माझ्याविरूद्ध केल्यामुळे महार समाजातील पुष्कळ लोक साहजिकपणे चिडून गेले आहेत. त्यांना माझे विनंतीपूर्वक पण निक्षून असे सांगणे आहे की, त्यांनी आपला राग आवरून धरला पाहिजे. महार लोक हे बहुसंख्यांक आहेत. ' कोणी काही म्हटले तरी त्यांचे कर्तव्य उघड आहे. इतर अल्पसंख्यांक जातींचे जेणेकरून समाधान होईल तेच धोरण आपण अखेरपर्यंत कायम ठेविले पाहिजे. निष्कारण दोषारोप करणाऱ्या लोकांना थाच धोरणाची कास धरून आपण समर्पक उत्तर देऊ शकतो. अस्पृश्यात भांडणे लागावी व महाराविरूद्ध चांभाराला उभे करून आपल्या कार्याचा नाश करावा व आपल्याकडे बोटे दाखवून आपल्याला हिणवावे हा तर आपल्या हितशत्रूंचा एक डावच आहे. तो आपण हाणून पाडला पाहिजे. बहुसंख्य समाज या नात्याने ही जबाबदारी महार वर्गावरच अधिक व प्रामुख्याने पडते व त्यांनी ती सांभाळलीच पाहिजे असे महार समाजाला माझे वारंवार निक्षून सांगणे आहे. ' जशास तसे ' या न्यायाने चांभारांच्या या आरोपांना तुम्ही उत्तरे देऊ शकता व त्यांच्याशी जशास तसे वागू शकता. पण यात आपल्या चळवळीचे हित होणार नाही. औदार्य व क्षमावृत्ती यांचीच आधण बळकट कास धरली पाहिजे. हेच धोरण आपल्या कार्याला व ध्येयाला शेवटी हिताबह व भूषणावह होणार आहे.