अस्पृश्यात भांडणे लावणार्या हितशत्रूंचा डाव ओळखा २६१
महार जातीतील काही लोकांकडूनही माझ्यावर टीका करण्यात येते. मी शिक्षणाचे कार्य करीत नाही. सत्याग्रहाच्या वगैरे चळवळी करतो असा कित्येकांचा माझ्याविरूद्ध आक्षेप आहे. शिक्षणाचा अर्थ माझे हे टीकाकार काय व किती व्यापक करतात हे समजते तर त्यांचे समाधान करणे अधिक सुलभ झाले असते. सत्याग्रहाच्या व माणुसकीचे हक्क मिळविण्याच्या चळवळीत उत्तम शिक्षण असू शकते व मिळू शकते ही गोष्ट त्यांना मला पटवून देता आली असती. पण ते ज्याला ' शिक्षण ' म्हणून ओळखतात ते शिक्षण देण्याच्या बाबतीतही माझा प्रयत्न माझ्या या कोणत्याही टीकाकाराच्या प्रयत्नापेक्षा मोठा आहे असे मी आव्हानपूर्वक सांगू शकतो. ठाणे, अहमदाबाद, धारवाड वगैरे ठिकाणची बोडिँगे मी चालविली आहेत. आज या घटकेला ७० विद्यार्थी माझ्या प्रयत्नाने फुकट शिक्षणाचा लाभ घेत आहेत. माझ्या टीकाकारांनीही या बाबतीतील आपल्या प्रयत्नाचा आढावा काढावा व शिक्षणाकरिता त्यांनी किती पैसा खर्च केला आहे व किती झीज सोसली आहे हे जनतेला सांगावे. स्वतः काही न करता दुसऱ्याने अमुक केले नाही व तमुक करावयाला पाहिजे होते असा पोकळ शिष्टपणा करू नये. वरील प्रकारचे टीकाकार विशेषतः नाशिक जिल्ह्यात मला आढळून आले. त्यांच्या टीकेत काही अर्थ तरी आहे; पण सातारा जिल्ह्यातील रा. निकाळजे वगैरे महार जातीची काही मंडळी मजवर जी टीका करते तिला शेंडा बुड काहीच नाही. . काहीतरी विरूद्ध करून दाखवावयाचे व काहीतरी अद्वातद्वा बोलून पुढारी म्हणवून घ्यावयाचे एवढाच त्यांच्या आयुष्याचा हेतू दिसतो. परवा या निकाळजे वगैरे मंडळींनी सातारा जिल्ह्यामार्फत महार समाजाची एक परिषद बोलावली होती आणि तिचे अध्यक्षपद पुण्याच्या मुजूमदार, इनामदार साहेबांना दिले होते. हे इनामदार साहेब केवळ जातीने नव्हे तर वृत्तीनेसुद्धा पेशवाईचे खरेखुरे वंशज आहेत. पुण्याच्या पर्वती सत्याग्रहाला विरोध करण्यात हे इनामदार साहेब प्रमुख होते. अशा व्यक्तीला अध्यक्ष करून व अस्पृश्यांच्या चळवळीची सूत्रे अशा परकीय व्यक्तीच्या हाती देऊन निकाळजेने काय दाखविले ? अस्पृश्यांची आजची चळवळ स्वावलंबनाच्या व स्वाभिमानाच्या पायावर चालली आहे. मुजूमदार साहेबासारख्याना अध्यक्ष करून या तत्त्वांवर बोळा फासण्याचा या निकाळजे वगैरे मंडळींनी प्रयत्न केला. यापेक्षा ते स्वतः अगर त्यांच्या मताचे एखादे अस्पृश्य पदवीधर जरी या सभेचे अध्यक्ष झाले असते तरी लोकांना ते आवडले असते पण इनामदार साहेबांना अध्यक्ष करून सभेला तेही आले नाहीत व लोकही जमले नाहीत. रा. निकाळजेसारख्या लोकांशी मी जुळते घेत नाही असा माझ्यावर एक आरोप करण्यात येतो पण यांच्याशी जुळते