२७२ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
मी सर्वाच्या निदर्शनास आणू इच्छितो. इंग्रज राज्यकर्त्याँविरूद्व अस्पृश्य समाजाच्या काही विशिष्ट तक्रारी आहेत ; पण तेवढ्यासाठी राजकीय सत्तेची अदलाबदल झाली पाहिजे अशी ओरड अस्पृश्य लोकांनी केलेली नाही. केवळ राजकीय सत्तेच्या अदलाबदलीकरता ते फारसे उत्सुकं नाहीत. पण जे लोक या गोष्टीकरता चळवळ करून राहिलेले आहेत त्या चळवळीला थोपवून धरणे जर सरकारला शक्य नसेल व त्यामुळे राजकीय सत्तेची जर विभागणी करणे भागच असेल तर ती सत्ता मुसलमान अगर हिंदू समाजातील काही थोडक्या लोकांच्या अगर विशिष्ट कंपूच्या आहारी पडणार नाही तर त्या सत्तेची योग्य व आवश्यक अशा प्रमाणात सर्वसामान्य जनतेत व पददलित जातीत विभागणी होईल याबद्दलची खबरदारी घेणे व तेवढ्यासाठी काही संरक्षक अटीची (Safeguards) आधी तरतूद होणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने विचार करता या प्रश्नाचा आधी निकाल लावल्याशिवाय व भावी राज्यघटनेत आम्ही कोठे आहो हे निश्चित समजल्याशिवाय ती राज्यघटना तयार करण्यात आम्ही अंत:करणपूर्वक कसा भाग घेऊ शकणार ?
७ ७ ७