२९-११-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विझता कामा नये - Page 324

२८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सहा कोटी अस्पृश्य जनतेने आपणास राजकीय हक्क पाहिजेत याविषयी जी घोषणा केली आहे ती खरोखरच अलौकिक आहे. पुढाऱ्याच्या मागे असलेली जनता निर्भयतेने कंबर बांधील तर जगात कोणत्याही कार्याला यश मिळालेच पाहिजे. माझ्या सहा कोटी अस्पृश्य बंधुंनी हिंमत धरली तर हिंदुस्थानातील लोकांना स्वराज्य मिळवावयास कितीसा अवधी लागणार आहे! तुमच्या अंत:करणातील माणुसकीचा ओलावा सुकू देऊ नका. काही वर्षापूर्वी जी गोष्ट आपल्या पूर्वजांना अशक्य वाटत होती ती आज दहा वर्षात शक्‍य होऊ पाहात आहे. निदान गेल्या दोन वर्षात झालेली जागृती केव्हाही अपूर्व स्वरूपाचीच ठरेल. या माझ्या कार्यात काही दिवसापूर्वी माझ्या चांभार बंधुंचा माझ्यावर विश्वास नव्हता आणि ही गोष्ट माझ्या मनाला सारखी सलत होती. परंतु आज मी ज्या बोटीने हिंदुस्थानात आलो त्या बोटीवर तुम्हा इतर समाजातील पुढाऱ्यांप्रमाणे माझे स्वागत करण्यास अचानकपणे मि. पी. बाळू, श्री. राजभोज, काजरोळकर, पवार वगैरे चांभार समाजातील मंडळी आलेली पाहून माझे अंत:करण आमंदातिशयाने भरून आले. माझ्या महार समाजातील मंडळींना पाहून मला जितका आनंद झाला त्याहीपेक्षा अधिक या मंडळींच्या प्रेमाच्या भेटीने झाला. मी मनुष्य आहे. मनुष्याच्या हातून चुका घडणे शक्य आहे. या गोष्टी अनुसरून माझ्या हातून आपले कार्य करीत असता पक्षपात झाला असेल आणि त्याचे कारण इतकेच की, आपला अस्पृश्य मानलेला समाज इतका पददलित आहे की त्यांच्या कार्याची व्यापकता फार आहे. अशा परिस्थीतीत मी एकट्याने सर्वांचे समाधान कसे करू शकणार ? आपले समाजकार्य खरे म्हटले म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. असो, तरीपण त्यांच्या स्वागताने माझे कल्पनेबाहेर समाधान झालेले आहे. आपल्या सार्वजनिक कार्यात त्यांच्या राजकीय हक्काविषयी मी त्यांना पूर्णपणे हमी देऊ शकतो.

माझा जरी महार जातीत जन्म झाला असला तरी मी सर्वस्वी महार लोकांसाठीच प्रयत्न करीन असे कधीच होणार नाही. उलट माझ्या समाजाला काहीच मिळाले नाही तरी चालेल. परंतु इतरांसाठी मी वाटेल ते करू शकेन. मात्र त्यांचे मला माझ्या कार्यात जिवाभावाचे सहकार्य पाहिजे. आपल्या कार्यात आंपल्या समाजातील निरनिराळ्या जातींची. एकी झाल्यावर पुढील गोष्टी एकमेकांच्या संमतीने व गुण्या गोविंदाने सोडविणे मला अशक्य असे वाटत नाही... म. गांधींच्या बोलण्याने ज्यांचे समाधान होत नाही त्यांचे माझ्या बोलण्याने काय समाधान होणार आहे ! तरीपण प्रयत्न हा केलाच पाहिजे. आपली एकी महारापासून तो भंगी समाजापर्यंत सर्व समाजात झालीच पाहिजे आणि या सर्व समाजांची उन्नती करणे हे माझे मी उच्च असे ध्येय समजतो आणि याबाबतीत सर्वांनी एकमेकांविषयी © आपल्या अंतःकरणात पूर्ण विश्‍वास ठेवावयास पाहिजे.