अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच २९५
रा. वनमाळी व रा. निलप्पा एलाप्पा बेलोडी हे जातीने चांभार आहेत व रा. बसाप्पा नागाप्पा घोडके हे जातीने ढोर आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवली म्हणजे काँग्रेसच्या लोकांकडून जी फुटाळकीवजा विधाने केली जातात की, डॉ. आंबेडकरांच्यावर फक्त महार जातीचाच विश्वास आहे तसेच स्वतंत्र मतदार संघ फक्त महार लोकांनाच पाहिजे व चांभार, ढोर स्वतंत्र मतदार संघाचे विरोधी आहेत ते किती फोलकट आहेत हे सहज दिसून येण्यासारखे आहे. उल्लेख करण्यासारखे दुसरे पत्र म्हणजे, आसाम प्रांतातील अस्पृश्यांचे पुढारी बाबू सोनाधरदास सेनापती यांनी रा. ब. एम. सी. राजा यांना डॉ. आंबेडकरांच्या माफत पाठविलेले होय.
परिषदेला कलकत्त्याहून अखिल भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे जनरल सेक्रेटरी यांचेही एक पत्र आले होते. त्यात परिषदेचे अभिष्ट चिंतून सर्व अस्पृश्य वर्गानी बुद्ध धर्माची दीक्षा घ्यावी असे सूचित केले होते.
नंतर विषय नियामक कमिटीची निवड करण्याचा प्रश्न विचारात घेण्यात आला. रात्री बरोबर ११ वाजता विषय नियामक कमिटीच्या बैठकीस सुरूवात होऊन कमिटीचे काम रात्री ३ वाजता संपले. विषय नियामक कमिटीत ज्या ज्या लोकांचे जे काही प्रश्न होते त्या सर्वास डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट उत्तरे देऊन सर्वांचे चांगले व पूर्णपणे समाधान केले.
दुसऱया दिवसाचा कार्यक्रम
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता कॉँग्रेसच्या अधिवेशनास पुन्हा सुरुवात झाली. लोकसमुदाय पहिल्या दिवसाइतकाच होता. सुरवातीस अध्यक्षांनी काँग्रेसचे यश चिंतणाऱ्या आणखी तारा आल्याचा उल्लेख केला. नंतर काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनात खालील ठराव मांडण्यात आले.-
| काँग्रेसमधील ठराव
ठराव १ ला.--ही काँग्रेस सार्वभौम बादशहाठायींची आपली राजनिष्ठा व्यक्त
करते.
ठराव २ रा.--ही काँग्रेस खुनाच्या चळवळीचा व कायदेभंगाच्या चळवळीचा निषेध करते व ह्या चळवळीला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारने करावा, अशी सरकारास सूचना करते.