३०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अध्यक्षस्थान स्वीकारले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तरादाखल भाषण केले. ते म्हणाले,
दि. ब. लठ्ठेसाहेब व सद्गृहस्थहो !
आपण या ठिकाणी मला आणण्याचा योगायोग जुळवून आणिला याबद्दल मी आपला आभारी आहे.
आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोही, देश विघातक, हिंदू धर्म विघातक व हिंदू- हिंदूत दुफळी पाडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणास म्हणण्यात येत असेल, देशात अत्यंत मोठा शत्रू असे जर कोणास म्हणण्यात येत असेल तर ते भलाच होय. परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राऊंड टेबल परिषदेच्या कार्याची जर आजचे माझे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना हीच गोष्ट कबूल करावी लागेल, ती ही की डॉ. आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केले आहे. जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांनी कबूल केली नाही तरी त्यांना मी कवडीचीही किंमत देणार नाही. माझ्या कार्यावर माझ्या दलित समाजाचा विश्वास आहे. हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो आणि ज्या समाजात माझा जन्म झाला आहे व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे. माझ्या टीकाकारांची मला पर्वा नाही. मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे. आज शंभर वर्षापासून सुधारक, दुर्धारक, जहाल, मवाळ लोकांचे राष्ट्राचे नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे. त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही. मग माझ्यापासूनच त्यांनी राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी ? मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे.
महाड, नाशिक आणि इतर ठिकाणच्या सत्याग्रहावरून माझी अशी खात्री झाली आहे की, हिंदू लोकांची अंतःकरणे दगड विटांच्या भितीप्रमाणे निर्जीव आहेत. त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची, इतरांना बरोबरीचा हक्क देण्याची चाड नाही. दगडाच्या भितीवर डोके आपटून आपला कपाळमोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार परंतु त्या भिंतीच्या ठिकाणची कठोरता नाहीशी होणार नाही. त्याचप्रमाणे हिंदू लोकांच्या अंतःकरणाची कठोरता नाहीशी होणार नाही. तेव्हा याबाबतीत माझे पूर्णपणे मतपरिवर्तन झाले आहे. आजपर्यंत आपल्याला हिंदुंच्या देवाचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही किंवा आजपर्यंत हिंदुंच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे ' माणसे ' झाली नाहीत.ते आम्हास शिवून घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही.
यापुढे आम्ही सरकारी अंमलदारांचे तंबू मारणारे व झाडलोट करणारे राहणार नाही. इतरांप्रमाणे आम्ही राजकीय सत्ता हाती घेणार आणि आपले सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणार. यापुढे आम्ही कोणाचेही गुलाम राहणार नाही असा आमचा कृतनिश्चय आहे. यानंतर डॉ. आंबेडकर यांनी भाषण संपविले. हा गोड समारंभ ७-८ हजार लोक समुदायाच्या टाळ्यांच्या गजरात बरखास्त झाला.
७ ७ ७