२३-५-१९३२ वदर्शनाशिवाय कोणी मरत नाही - Page 346

३०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जर आम्ही चिकटून राहिलो तर आम्हाला नरकात खितपत पडावे लागते व यामुळे माझ्या सारख्यालासुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आला आहे. एवढेच नव्हे तर धर्मातरसुद्धा करावेसे वाटते. परंतु मी तसे का करीत नाही. मी या नरकातच का राहतो म्हणाल तर मला तुम्हाला सर्वांना सोडून जाववतच नाही. मी कोठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिंमतीवर राहू शकेन. परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जाववत नाही एवढेच आहे आणि दुसरे मी जे काम हाती घेतलेले आहे ते मला शेवटास न्यावयाचे आहे. मी तुम्हाला इतकेच सांगतो की, तुम्ही या धर्माच्या भानगडीत पडू नका. मागे २,००० वर्षे हिंदुंनी राज्यकारभार केला त्यानंतर आता १५० वर्षे इंग्रजांनी चालविला, परंतु आता यापुढे जे स्वराज्य मिळणार आहे त्यात एकटे हिंदूच राज्यकारभार चालविणार नसून तोच राज्यकारभार तुम्हा अस्पृश्यांच्या व हिंदुंच्या संमतीने चालणार आहे.

प्रत्येक समाजामध्ये काहीना काहीतरी सामर्थ्य असते. काहींच्या हातात आर्थिक सामर्थ्य असते. पारशी समाज पाहा. तो या ठिकाणी बसलेल्या लोकांपेक्षा काही जास्त नाही. परंतु त्याच्यात आर्थिक सामर्थ्य आहे. आपल्या समाजातील माणसे तर त्यांच्याकडे मजुरीची कामे करितात. ब्राह्मण समाजामध्ये जरी आर्थिक सामर्थ्य नाही कारण सर्वच ब्राह्मण काही श्रीमंत आहेत तसे नाही, परंतु त्यांच्या हातात धार्मिक सत्ता आहे. समाजाच्या हाती राजकीय सत्ता असणे फार इष्ट आहे व अशा प्रकारची राजकीय सत्ता आपल्यासाठी मिळविण्याकरिताच मी राऊंड टेबल परिषदेला गेलो होतो व त्या जाण्याचा फायदाही आपणास मिळाला आहे. ते मी थोडक्यात सांगतो.

मी राऊंड टेबल पर्दरेषदेला जाऊन अस्पृश्यांकरिता १० जागा मिळविल्या. माझ्याविरूद्ध जे टीका करतात ते म्हणतात की, डॉ. आंबेडकरांनी राऊंड टेबल परिषदेस जाऊन काय मिळविले ? परंतु तीच माणसे जर आता ह्या ठिकाणी हजर असती तर मी त्यांची पक्की खात्रीच करून दिली असती की, जे काही मी मिळविलेले आहे ते दुसऱ्या इतर कोणत्याच समाजास मिळालेले नाही. एखाद्या कोंबड्यापुढे जर आपण मोती टाकले तर त्यास त्या मोत्याची काही एक किंमत न कळता ते मोती त्याला जोंधळ्याच्या एका दाण्यापेक्षा हलके वाटले असते.

या दहा जागा मिळाल्यामुळे आपल्या समाजाच्या हाती बरीच सत्ता आलेली आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे आता जे स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी चालवितील. ते स्वराज्य तुमच्या संमतीने, तुमच्या सल्ल्याने, तुमच्या मतानेच चालेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावरच आहे. आपणास आता जे काही मिळाले आहे ते माझ्या मताप्रमाणे अगदी पुरेसेच आहे. आपल्याकरिता १० जागा अगदी राखीव आहेत.