३१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अल्पसंख्यांक या नात्याने आम्ही दोन मागण्या पुढे करीत आहो. जीवितस्वातेत्र्य आणि मालमत्ता यांचे संरक्षण व्हावे म्हणून ' मूलभूत हक्क ' आम्हास मिळावे आणि त्याबरोबरच अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्याबद्दल हमीदेखील मिळावी ही आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी म्हणजे कायदे मंडळाकडून अगर कार्यकारी मंडळाकडून आपल्या हक्कास उपसर्ग पोहोचू नये म्हणून कायदे मंडळात प्रतिनिधीत्व मिळावे ही होय. दुसऱ्या लहान मोठ्या अल्पसंख्यांकांच्या मागण्या याच स्वरूपात आहेत. मुसलमान व शीख या उभयता जातींच्या बाबतीत गांधींनी या दोन्ही मागण्या सर्वाशाने मान्य केल्या आहेत. पण अस्पृश्यांना मात्र खास प्रतिनिधीत्व देण्याचे ते नाकारित आहेत. मूलभूत हक्क तुम्हाला दिले जातील आणि त्यावर तुमचे समाधान झाले पाहिजे, असे गांधीजी आम्हाला सांगत आहेत. परंतु खास प्रतिनिधीत्वाबाबत शीख, मुसलमान आणि अस्पृश्य यामध्ये पंक्तिप्रपंच का दाखविण्यात यावा हेच आम्हाला समजत नाही.
उघड उघड दाखविलेल्या या पक्षपाताबद्दल कदाचित गांधीजींना शरम वाटत असावी आणि म्हणूनच अस्पृश्यांना सज्ञान मताधिकार (Adult Suffrage) देऊ करुन वाटत असलेल्या लज्जेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न ते करीत असावे. भेदाभेद करण्याच्या या धोरणाच्या मुळाशी जी भावना वास करीत आहे, तिचा क्षुद्रपणा सज्ञान मताधिकार दिल्याने मुळीच कमी होत नाही. कारण ही मतदानपद्धती फक्त अस्पृश्यांनाच मिळणार आहे असे नसून सर्वानाच तिचा फायदा मिळावयाचा आहे. सज्ञान मतदानपद्धती जोपर्यंत सार्वत्रिक राहील तोपर्यंत अस्पृश्यांच्या स्थितीत बिलकूल फरक होणार नाही. सध्याप्रमाणे ते मतदारांमध्ये अल्पसंख्यांकच राहणार. शिवाय दुसरा असाही प्रश्न उद्भवतो की, अस्पृश्यांचे हक्क संरक्षण जर फक्त सज्ञान मतदान पद्धतीमुळे होत असेल तर शीखांचे व मुसलमानांचे देखील हक्क संरक्षण त्याच उपायाने का होऊ नये ? सर्वानुमते शीख व मुसलमान आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांच्यात संघटना आहे आणि नागरिकत्वाचे हक्क ते पूर्णाशाने उपभोगीत आहेत. पण अस्पृश्यांची स्थिती. त्यांच्या उलट आहे. अस्पृश्य सांपत्तिकदृष्ट्या अगदी खालावलेले आहेत. त्यांच्यात संघटना मुळीच नाही ; सर्वसाधारण नागरिकाचे हक्क त्यांना मिळत नाहीत आणि शिवाय इतर समाजाकडून त्यांना अतिशय कठोरपणे वागविण्यात येते. कोणीही न्यायी बुद्धीचा मनुष्य निरनिराळ्या जातीकडून पुढे करण्यात येत असलेल्या मागण्यांचा समतोलपणाने विचार करील तर इतर अल्पसंख्यांकाहूनही अस्पृश्यांनाच जास्त हक्कसंरक्षण मिळाले पाहिजे असेच तो मत देईल.