१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 364

३२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हे ठरवावे. परंतु आता असे वाटते की, सरकारला आगाऊ कळविल्याखेरीज आपण आपली शपथ प्रत्यक्ष कृतीत आणणे ही गोष्ट न्याय्य होणार नाही, शिवाय, माझ्या विधानाबद्दल जे महत्त्व मला वाटते तितके इतरांना न वाटणे हेही सहाजिकच होय.

मी स्वतंत्र मतदारसंघास विरूद्ध का ?

अस्पृश्य वर्गाकरता स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्याच्या योजनेला माझा जो विरोध आहे तो तपशीलवार या ठिकाणी पुनः सांगण्याचे कारण नाही. मी एक अस्पृश्यच आहे असे स्वतःला समजतो. इतरांची गोष्ट व त्यांची गोष्ट अगदी वेगळी आहे. कायदे मंडळात त्यांचे प्रतिनिधी असावे याला मी विरूद्ध नाही. दुसऱ्या वर्गाकरिता मतदानाचा अधिकार कितीही संकुचित करण्यात आला तरी चालेल. परंतु शिक्षण, मालमत्ता वगैरे बाबतीतील जरूर अशा मतदार होण्याच्या अटी अस्पृश्यांना न लावता त्यांच्यापैकी प्रत्येक स्त्रीपुरुषाचे नाव मतदारांच्या यादीत समाविष्ट व्हावे. असे माझे मत आहे. परंतु मतदारसंघ दिल्याने त्यांचे व केवळ राजकारणाचे दृष्टीने पाहता हिंदू समाज म्हणून जो काही आहे त्यांचे फार नुकसान होणार आहे असे मला वाटते. स्वतंत्र मतदार संघामुळे त्यांचे किती नुकसान होणार आहे याची बरोबर समजूत पटण्याकरिता स्पृश्य हिंदू समाजामध्ये अस्पृश्य वर्ग कसा सामील आहे व तो त्या समाजावर किती अवलंबून आहे याची जाणीव असणे जरूरीचे आहे. हिंदू समाजाविषयी बोलावयाचे असल्यास मी असे म्हणेन की, स्वतंत्र मतदार संघामुळे त्या समाजाला जिवंतपणीच छिन्नविछिन्न केल्यासारखे होणार व त्यात फाटाफूट होणार !

माझ्या समजुतीने या दलित वर्गाचा प्रश्‍न हा प्रामुख्याने नैतिक व धार्मिक आहे. या प्रश्‍नाच्या नैतिक व धार्मिक महत्त्वापुढे राजकारणाच्यादृष्टीने त्याचे महत्त्व कवडी किंमतीचे ठरते.

मी प्राणांतापर्यंत अन्नत्याग करणार

मी अगदी लहान असल्यापासून या वर्गाच्या स्थितीबद्दल किती काळजी करीत होतो व अनेक वेळा त्यांच्याकरिता मी प्राणार्पणही करावयास तयार झालो होतो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली, तरच याबाबतीत माझ्या भावना कोणत्या प्रकारच्या आहेत याची तुम्हाला पारख होईल, या प्रकरणात ही गोष्ट मी गर्वाने सांगतो असे मात्र नव्हे. कारण माझे असे मत आहे की, शतकेच्या शतके या अस्पृश्य वर्गांना ज्या अपमानाच्या दलित स्थितीत हिंदू समाजाने ठेवले आहे त्याची भरपाई हिंदू समाजाने कोणतेही प्रायश्चित्त यापुढे घेतले तरी होणार नाही.