३२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे '
(११) अँग्लो इंडियन मतदार स्वतंत्र मतदार संघातून मते देतील. त्यांच्यासाठी सर्व प्रांतांची क्षेत्रमर्यादा ठेवण्याचा विचार असून पोस्टाने मते पाठविण्याचीही तरतूद करता येईल. परंतु या बाबतीतील व्यावहारिक अडचणीचा विचार करावयाचा असून अद्याप निश्चित निर्णय करण्यात आलेला नाही.
(१२) मागासलेल्या भागांना द्यावयाच्या जागांचा प्रश्न अद्याप विचारात असल्यामुळे आता अशा विभागासाठी दिलेल्या जागा ह्या तात्पुरत्या समजण्यात
याव्या.
स्त्रियांचे प्रतिनिधी
(१३) कायदे मंडळातील स्त्रियांचे थोडे तरी प्रतिनिधी निश्चितपणे यावेत या गोष्टीला साम्राज्य सरकार फार महत्त्व देत असून स्त्रियांसाठी काही जागा राखून ठेवल्याशिवाय ही गोष्ट शक्य दिसत नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांचे प्रतिनिधी एकाच जातीतून प्रमाणाबाहेर येता कामा नये. परंतु हे भय नाहीसे करण्याचा निश्चित मार्ग अद्याप सरकारला सापडलेला नाही. म्हणून स्त्रियांच्या प्रतिनिधींची एकेक जागा एकेका जातीकरिता मर्यादित करण्यात आली असून त्याला अपवाद कलम २४ मध्ये नमूद करण्यात आले आहेत व अशारीतीने स्त्रियांच्या खास जागा निरनिराळ्या जातींमध्ये विभागण्यात आल्या आहेत; मात्र त्यांच्या निवडणुकीच्या निश्चित पद्धतीचा अद्याप विचार चालू आहे.
मजूर वर्गाचे प्रतिनिधी
(१४) मजूर वर्गाचे प्रतिनिधी जातिविशिष्ट नसलेल्या मतदार संघातून निवडण्यात येतील. निवडणुकीचा मार्ग अद्याप निश्चित व्हावयाचा आहे. पण काही ठिकाणी मजुरांचे प्रतिनिधी ट्रेड युनियन्समधून निवडून येतील व काही ठिकाणी मतदार कमिटीने शिफारस केल्याप्रमाणे खास मतदार संघातून निवडून येतील.
(१५) व्यापार, उद्योगधंदे, खाणी व मळे यांना दिलेल्या खास जागांवरील निवडणुकी, चेम्बर्स ऑफ कॉमर्स व इतर संस्था यांच्यामार्फत होतील. पण त्या संबंधीच्या सविस्तर योजनेचा अद्याप विचार चालू आहे.
(१६) जमीनदारांना दिलेल्या खास जागांवरील निवडणुकी जमीनदारांच्या खास मतदार संघातून होतील.