१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 374

३३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदुस्थानातील जातिविषयक प्रश्‍नाच्या बाबतीत आम्हाला ढवळाढवळ करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. गेल्या राऊंड टेबल परिषदेच्या प्रसंगी याबद्दल आम्ही मुद्दाम हा प्रश्‍न ' तुम्ही आपापसात सोडवा ' असे सांगितले आहे. आम्हाला पक्के ठाऊक आहे की, या जातिविषयक प्रश्‍नाचा आम्ही कसाही निर्णय दिला तरी प्रत्येक जातीला, समाजाला आपल्या मागण्या अपुऱ्या मिळण्याची कुरकूर राहणारच. तरी पण हिंदी राजकीय घटना सुरळीतपणे यशस्वी होण्यासाठी प्रत्येक समाजाला काहीतरी सोयीचे मार्ग स्वीकारून संघ शक्तीने ही नवीन घटना अंमलात आणणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या उज्ज्वल कर्तव्याची जाणीव झाल्यास हिंदुस्थानला ब्रिटिश राष्ट्राच्या वसाहतीच्या घटनेत नवीन स्थान प्राप्त होईल.

आमचे कर्तव्य उघड आहे. जातिविषयक प्रश्‍नाबाबत समाजासमाजात एकमत न होता उलट नवीन राज्यघटनेला अडथळा उत्पन्न होण्याची भीती वाटल्यास सरकारला कडक उपाययोजना करणे भाग पडेल आणि म्हणून आम्ही पूर्वी वचन दिल्याप्रमाणे व गेल्या दोन्ही गोलमेज परिषदेमध्ये हिंदुस्थानातील निरनिराळ्या समाजाच्या प्रतिनिधींनी केलेल्या विनंतीप्रमाणे आणि ब्रिटिश सरकारने जो पूर्वी खुलासा केला होता त्याला अनुसरून आज आम्ही हिंदी प्रांतिक कायदे कौन्सिलातील निरनिराळ्या समाजाच्या प्रतिनिधींची संख्या कितपत असू शकेल हे जाहीर करीत आहोत. आम्ही हा जाहीर केलेला निर्णय प्रत्येक समाजाने पडताळून पाहून आम्ही नवीन राज्यघटेनेचे बिल पार्लमेंटला सादर करण्यापूर्वी आपला सलोख्याचा निकाल सादर करावा.

पार्लमेंट पुढे जाऊन आमच्या आजच्या या योजनेला कायद्याचे स्वरूप येण्यापूर्वी दुसरी एखादी सर्व हिंदी प्रतिनिधींच्या संमतीने तयार झालेली अशी जर एखादी योजना मध्यंतरी निर्माण होऊ शकली तर आम्हाला अर्थातच अतिशय आनंद वाटेल. पण मागील अनुभवावरून पाहता या बाबतीतील कोणतीही वाटाघाट अगर तडजोड फलद्रूप होत नाही आणि म्हणून हिंदी पुढाऱ्यांनी जर नवी योजना निर्माण करण्यासाठी वाटाघाट सुरू केली तर तिच्यात सरकार भाग घेऊ शकणार नाही : पण हिंदी पुढाऱ्यांनी आपापसात आपल्या ज्ञातिविशिष्ट भानगडी मिटवून सर्वांच्या संमतीने जर एखादी अशी नवीन योजना सादर केलीच तर आमची ही आजची योजना परत घेण्यास व ती नवीन स्वीकारण्यास सरकार मोठ्या आनंदाने कबूल होईल. एखाद्या विशिष्ट प्रांताने जरी सर्वसंमत अशी नवीन योजना तयार केली तरी त्या प्रांतापुरती आमची ही योजना रद्द करून ती नवीन स्वीकारण्यात येईल.