१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 379

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३३५

परिषदेच्या अल्पसंख्य मंडळीच्या बैठकीत जे धोरण मी जाहीर केले त्याला अनुसरून पाहाता मला तुमच्या निर्णयाला प्राणांतापर्यंत विरोध केला पाहिजे. तसे करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो हा की, प्रायोपवेशनाने प्राणत्याग करावयाचा. मीठ किंवा सोंडा घेऊन किंवा न घेऊन केवळ जलप्राशन करून उपोषण करावयाचे आणि मरण स्वीकारावयाचे असा माझा निश्‍चय मी जाहीर करीत आहे. या प्रायोपवेशनाच्या काळात ब्रिटिश सरकारने स्वतःच्या प्रेरणेमुळे किंवा लोकमताच्या दडपणामुळे आपल्या निर्णयाचा फेरविचार केला आणि त्यांनी आपली जातवार मतदारसंघाची योजना मागे घेतली, तर माझा उपवास थांबेल. अस्पृश्यांचे प्रतिनिधी सार्वत्रिक मतदारसंघातून निवडून यावेत आणि सर्वांना समान अधिकार असावा. मग त्यांचे क्षेत्र कितीही व्यापक होवो. यारीतीने जातिनिर्णय बदलण्यात आला नाही, तर सर्वसामान्य परिस्थितीत ता. २० सप्टेंबर रोजी दुपारपासून माझे प्रायोपवेशन सुरू होईल.

हे माझे पत्र तुम्हाला तारेने पाठविण्यात यावे असे मी येथील अधिकाऱ्यांना कळवीत आहे. म्हणजे त्यायोगे तुम्हाला बराच काळ आधी सूचना मिळाल्यासारखे होईल. हे पत्र टपालाने अगदी सावकाशीने आपल्या हाती पडले तरी मी तुम्हाला पुरेसा वेळ देतो आहेच. हे पत्र आणि होअर यांना मी पाठविलेले उपर्युक्त, ही दोन्हीही पत्रे शक्य तितक्या लौकर प्रसिद्ध करावीत, असे माझे म्हणणे आहे. तुरुंगातील नियम निष्ठेने पाळून मी या दोनही पत्रांची माहिती सरदार वल्लभभाई पटेल आणि श्री. महादेव देसाई यांजशिवाय दुसऱ्या कोणालाही दिलेली नाही. पण तुम्ही सवड दिली तर माझी इच्छा अशी आहे की, त्या पत्रांचा परिणाम जनतेवर व्हावा आणि म्हणूनच त्यांच्या प्रसिद्धीची मागणी मी केलेली आहे.

मी जो प्रायोपवेशनाचा निर्धार केला त्याबद्दल मला दुःख होते. पण एक धार्मिक प्रवृत्तीचा माणूस यादृष्टीने- आणि तसा मी आहे असे मी समजतो- मला दुसरामार्गच मोकळा नाही. होअर यांच्या पत्रात मी म्हटलेच आहे की, सरकारने आपली कुचंबणा टाळण्यासाठी मला बंधमुक्त करण्याचे ठरविले, तरी माझे प्रायोपवेशन चालूच राहील. कारण या जातिनिर्णयाला प्रतिकार दुसऱ्या कोणत्या साधनाने करता येईल अशी मला आशा वाटत नाही आणि सन्मानपूर्वक झाली तरच माझी मुक्तता मला हवी आहे, इतर मार्गांनी ती घडवून आणण्याची मला काडीमात्र इच्छा नाही.

' अस्पृश्यांना ' स्वतंत्र मतदार संघ देणे हे त्यांना व हिंदू धर्माला घातक आहे ही माझी समजूत सर्वस्वी चुकीची असू शकेल आणि माझे मत विकृती पावलेले असेल. खरोखरच जर तशी वस्तुस्थिती असेल, तर माझ्या जीविताचे तत्त्वज्ञान