३३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपला संकेत तर मला असा दिसतो की, सरकारी योजनेमुळे निकृष्ट अवस्थेला पोचलेल्या अस्पृश्यांना आपल्यातर्फे बोलणारे आपले म्हणून प्रतिनिधी निवडण्याचा जो फायदा मिळणार आहे तो फायदा त्यांना मिळूच नये व त्याचसाठी प्रायोपवेशनासारखे भयंकर दिव्य आचरण्यास आपण तयार झाला आहा. आपले हे प्रायोपवेशन अस्पृश्यांना संयुक्त मतदारसंघ मिळावा यासाठी दिसत नाही कारण तो त्यांना देण्यात आलाच आहे. तसेच हिंदू समाजात ऐक्य राहावे म्हणून आपला हा निश्चय आहे असे म्हणावे तर तेही खोटेच. कारण सरकारी योजनेत त्याचीही तरतूद करण्यात आलीच आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, मला तर असे वाटते की, वस्तुस्थिती लक्षात न घेता आपण हे दिव्य आचरण्याचे ठरविले आहे. बरे, जातवारीच्या निर्णयाचा विचार न करता सर्व हिंदी लोकांनी हातपाय गाळून आम्हाला जेव्हा विनंती केली, तेव्हाच मनातून नसतानाही ब्रिटिश सरकारने अल्पसंख्यांकांचा प्रश्न हाती घेण्याचे आम्ही ठरविले. आता त्या निकालात एका अटीशिवाय फेरबदल होणे शक्य नाही व ती अट म्हणजे ही की, जातींनी मिळून एकमताने एक योजना केली तर ती सरकार मान्य करील.
सर सॅम्युअल होअर यांच्या पत्रासह सर्व पत्रव्यवहार प्रसिद्ध व्हावा अशी तुमची इच्छा आहे. याप्रमाणे तो प्रसिद्ध करण्यास माझीही संमती आहे. शेवटी आपल्याला माझी एवढीच विमंती की, सरकारी निर्णयाचा आपण पुनःएकवार साकल्येकरून विचार करून आपण जी भयंकर गोष्ट करण्यास सिद्ध झाला आहात तिची उपयुक्तता ठरवावी.
आपला,
(सही) जे. रेंम्से मॅकडोनाल्ड '“१
'' म. गांधीची प्रायोपवेशनाची प्रतिज्ञा
महात्मा गांधी यांनी मि. रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या वरील पत्राला ता. ९ सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा तुरूंगातून पुढील आशयाचे पत्र पाठविले.
““ प्रिय मित्र,
आपण जे स्पष्ट व सविस्तर पत्र पाठविले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. वाईट वाटते की, आपण माझ्या मनातही नसलेला अर्थ केला आहे. मागासलेल्या वर्गाच्या हिताचा बळी घेण्यास मी निघालो आहे हा जो आपण माझ्यावर आरोप करता त्याला सरळ उत्तर म्हणजे माझे हे दिव्य व्रतच होय. मला तर असा निश्चय करणे धर्म्य वाटते. अस्पृश्यांना दुबार मतदानाचा हक्क मिळाला एवढ्याच गोष्टीने हिंदू समाजात पडणारी दुफळी टळू शकत नाही. अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्यामुळे त्यांचा फायदा तर होणार नाहीच परंतु त्यामुळे हिंदू समाजात विष टोचल्याप्रमाणे मात्र झाले आहे. मला एवढेच म्हणावयाचे आहे की, जिव्हाळ्याच्या व धर्ममूलक प्रश्नाचा निर्णय आपल्याला योग्य लावता येणे शक्यच नाही. |
१ तत्रैव : पृ. २३-२५.