१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 383

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . .. . मला पर्वा नाही ३३९

अस्पृश्यांना वाजवीपेक्षा जास्त प्रतिनिधित्व देण्याच्याविरूद्ध मी जाणार नाही. ज्या गोष्टीचे शल्य मला बोचते ती गोष्ट म्हणजे हिंदू समाजापासून अस्पृश्यांना कायद्याने तोडून काढण्यात येत आहे. या सरकारी योजनेमुळे आजपर्यंत अस्पृश्योद्धाराची चळवळ ज्या महापुरुषांनी मोठ्या स्वार्थत्यागाने केली त्यांच्या प्रयत्नांवर पूर्ण विरजण पडणार आहे. त्यासाठीच प्रायोपवेशनाचे दिव्य अंगीकारण्यास मी तयार झालो आहे. माझ्या या व्रतासाठी मी अस्पृश्यांचाच तेवढा प्रश्‍न घेतला आहे. याचा अर्थ मात्र असा नव्हे की, आपल्या निर्णयातील इतर गोष्टी मला मान्य आहेत. माझ्या मते या निर्णयातील इतर बाबीही तितक्याच सदोष व आक्षेपार्ह आहेत.

आपला स्नेहांकित

(सही) एम्‌. के. गांधी “१

'“ गांधीजींनी आत्महत्त्येची जी प्रतिज्ञा केली आहे त्याविषयी आपल्याला काय वाटते असे वर्तमानपत्राच्या बातमीदारांनी डॉ. आंबेडकरांना विचारले असता ते म्हणाले :--

अन्नत्याग करून मी आत्महत्या करतो अशी गांधीजीने जी धमकी दिलेली आहे ती सरळ अगर प्रामाणिक युद्धाचा प्रकार नसून केवळ राजकारणातील हुलकावणीचा तो एक डाव आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याशी विचारविनिमय करण्याचा अगर त्यांचे मन वळविण्याचा हा सरळ मार्ग नव्हे अगर ही प्रामाणिक तप्हाही नाही. आणि त्यामुळे गांधीजींच्या या हुलकावणीचे मला महत्त्वही वाटत नाही व त्याचा माझ्या मनावर गांधीजीला इष्ट अगर अनुकूल असा परिणामही त्यामुळे होऊ शकत नाही.

माझा निर्णय आहे तो कायम आहे. हिंदूंच्या स्वार्थाकरता आपला प्राण पणास लावून गांधीजीला जर अस्पृश्य समाजाविरुद्ध संग्रामच करावयाचा असेल तर अस्पृश्य समाजालाही आपल्या हक्कांच्या प्राप्तीसाठी व संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास सज्ज होणे भाग पडेल.

गांधीजीने आपले म्हणणे स्पष्ट मांडावे

गांधीजींच्या आग्रहाचा आपण काहीच का विचार करणार नाही असे विचारले असता डॉ. आंबेडकर म्हणाले, की गांधीजींनी कशा करता आपला प्राण पणाला लावला आहे याचा स्पष्ट खुलासा त्यांनी जो पत्रव्यवहार प्रसिद्ध केला आहे त्यावरुन होत नाही. अस्पृश्यांकडून ते कशाची अपेक्षा करतात व अस्पृश्य समाजास हिंदुंच्या वतीने प्रत्यक्ष असे कोणते हक्क देण्यास ते तयार आहेत व त्यांच्या त्या देणगीला मान्यता देण्यास ज्या ' हिंदू धर्मा ' करता ते आपला प्राण ईरेस घालून राहिले आहेत तो हिंदू समाज कितपत तयार आहे याचा स्पष्ट व खात्रीलायक खुलासा होईपर्यंत मलाही या बाबतीत काही निश्चित [सांगता ] येण्यासारखे नाही." २

१ तत्रैव : पृ. २५-२६.

२ जनता : १७ सप्टेंबर १९३२.