३४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
धर्मबंधनांनी त्याला सर्वतोपरी जखडून टाकण्यात आलेले आहे त्या धर्मामुळे त्याचा सन्मान होण्याऐवजी उलट महारोग्याच्या किळसवाण्या अवस्थेला या धर्माने अस्पृश्य समाजाला आणून बसविले आहे. या धर्माने त्याची माणुसकीच कलंकित व खच्ची करून टाकलेली आहे. रोजच्या साध्या व्यवहारात सन्मानपूर्वक भाग घेण्याची योग्यताही या धर्माने अस्पृश्य समाजातील व्यक्तीच्या ठायी राहू दिलेली नाही. आर्थिकदृष्ट्या पाहताही अस्पृश्य समाज हा सर्वतोपरी परावलंबी असा एक वर्ग आहे. रोज लागणाऱ्या भाकरीच्या तुकड्यासाठी देखील उच्चवर्णीय हिंदूंवर त्याला अवलंबून राहावे लागते. स्वाभिमानपूर्वक अगर स्वतंत्ररित्या जगण्याचा अगर आपले पोट भरण्याचा एकही मार्ग अस्पृश्य समाजाला खुला नाही. या गुलामगिरीतून मुक्त होण्याची त्याला कधीही संधी मिळू नये म्हणून स्वावलंबनाचे व आत्मोन्नतीचे त्याचे सर्व मार्ग रोखून धरण्याचे खास प्रयत्न बुद्धिपुरःसरपणे करण्यात येत आहेत. स्पृश्य हिंदुंचे आपापसात कितीही जातीभेद असले तरी अस्पृश्यांनी वर डोके काढण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी त्यांना दडपून टाकण्यास व त्यांच्यावर नाना तऱहेने जोरजुलूम करण्यास तेवढ्यापुरते तरी सारे स्पृश्य हिंदू निर्दयपणे एक होतात असा प्रत्येक खेड्यातील नेहमीचा प्रत्यक्ष अनुभव व जीवनक्रम आहे असे म्हटल्यास त्यात मुळीच अतिशयोक्ती नाही.
अशा परिस्थितीत सर्व विचारी व न्यायी माणसांनी तर उलट असे प्रयत्न केले पाहिजेत की ज्यामुळे या सर्वतोपरी नाडलेल्या व स्पृश्य हिंदुंच्या जुलूमाखाली सर्वस्वी दडपून गेलेल्या अस्पृश्य समाजास आत्मरक्षणासाठी व या तीव्र जीवनकलहाच्या झगड्यात त्याला तग धरता यावा म्हणून आधारादाखल राजकीय सत्तेचा थोडा फार हिस्सा निश्चितपणे त्याच्या पदरी पडेल.
माझी तर अशी अपेक्षा होती की, अस्पृश्य समाजाचा कोणताही खरा हितचितक त्या समाजाच्या हाती राजकीय सत्तेचा शक्य तितका अधिक हिस्सा पडावा म्हणून जीवापाड झटेल. पण गांधीजींची विचारसरणी पाहावी तो ती उलटी व विलक्षण दिसते आणि म्हणून मला त्यांच्या या चमत्कारिक विचारसरणीचा काहीच उलगडा होऊ शकत नाही. अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सत्तेची सूत्रे शक्य तितक्या अधिक प्रमाणात आणण्यासाठी गांधीजी झटत तर नाहीच, पण उलट ब्रिटिश सरकारच्या ज्ञातिविषयक निर्णयामुळे जो अल्पसा का होईना पण राज्यसत्तेचा हिस्सा निश्चितपणे अस्पृश्य समाजाच्या हाती भावी राज्यघटनेत येऊ पाहत आहे, तो देखील अस्पृश्य समाजाच्या हातून हिरावून घेण्यासाठी आपला प्राण पणास लावून गांधीजींनी विरोध चालविलेला आहे । अस्पृश्य समाजाच्या पदरी राजसत्तेचा यत्किचितही हिस्सा पडू नये व राजकीयदृष्ट्या त्यांचे अस्तित्व दृष्टिआड करावे एवढ्यासाठी गांधीजींनी