१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 388

३४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ब्रिटिश सरकारच्यावतीने मुख्य प्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जो निर्णय दिला आहे व त्यात अस्पृश्यांच्याबाबतीत जी योजना मुक्रर केली आहे ती माझ्या मते हिंदूंना संतुष्ट राखण्याजोगी आहे, इतकेच नव्हे तर रावबहादूर राजा, गवई, पी. बाळू वगैरे अस्पृश्य समाजात संयुक्‍त मतदार संघाचा पुरस्कार करणारे जे लोक आहेत त्यांनाही या निर्णयाला नाके मुरडण्याचे मुळीच कारण नाही. असे असता रावबहादूरांनी असेंब्लीतील आपल्या भाषणातून या सरकारी निर्णयाविरूद्ध जो गिल्ला माजविला व जी कुरकूर केली तीही एक पाहण्या-ऐकण्यासारखीच गंमत होती ! परवापर्यंत स्वतंत्र मतदार संघाचे अनन्य उपासक व उच्च्वर्णीय हिंदुंच्या जातिभेदजनक जुलूमाचे SES दुष्मन असलेल्या या रावबहादूरांच्या हृदयात संयुक्त मतदार संघाविषयी व उच्चवर्णीय हिंदूंसंबंधी आता नव्याने उद्भवलेले एवढे अलोट प्रेम पाहून कोणाला बरे गंमत वाटणार नाही ? रावबहादूर राजांच्या ठायी उद्भवलेल्या या आकस्मिक प्रेमाच्या मुळाशी, राऊंड टेबल परिषदेत स्थान न मिळाल्यामुळे गमावलेल्या प्रसिद्धीच्या प्राप्तीची स्वाभाविक हाव कितपत आहे व या त्यांच्या नव्या प्रेमात प्रामाणिक हृदयपरिवर्तनाचा अंश कितीसा आहे याची छाननी मी तूर्त करू इच्छित नाही. .

सरकारने दिलेल्या निर्णयाविरूद्ध रावबहादूर राजाने सध्या जी कुरकूर चालविलेली आहे तिच्यात त्यांनी पुढील दोन मुद्यांवर भर दिलेला आहे. अस्पृश्यांना त्यांच्या संख्येपेक्षा कमी प्रमाणात जागा मिळाल्या हा या निर्णयाविरूद्ध त्यांचा पहिला आक्षेप आहे आणि या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हिंदूंपासून विभक्त झाला हा त्यांच्या शोकाचा दुसरा मुद्दा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी जागा या निर्णयामुळे अस्पृश्य समाजाच्या पदरात पडल्या ही रावबहादूरांची तक्रार मलाही मान्य आहे. पण ह्या ज्या कमी जागा मिळाल्या त्याची जबाबदारी गोलमेज परिषदेला गेलेल्या आम्हा दोघा प्रतिनिधोंवर आहे व आम्ही अस्पृश्य समाजाच्या हिताचा घात केला अशा प्रकारचे आरोप रावबहादूर राजांसारख्यांनी आमच्यावर करण्यापूर्वी आपण स्वत: सेन्ट्रल कमिटीवर असता काय दिग्विजय लावला याचा तरी थोडा विचार त्यांनी करावयाला पाहिजे होता. त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये मद्रासच्या वाटणीला १५० पैकी फक्त १०, मुंबईला ११४ पैकी फक्त ८, बंगाल मध्ये २०० पैकी ८ च, यु. पी. मधील अस्पृश्यांच्या वाट्याला १८२ पैकी ८, पंजाबमध्ये १५० पैकी फक्त ६, बिहार आणि ओरिसामध्ये १५० पैकी ६ च, मध्यप्रांत व वऱ्हाड मध्ये १२५ पैकी फक्त ८ व आसाममध्ये अस्पृश्य व इतर मागासलेल्या रानटी जातीकरिता म्हणून ७५ पैकी निव्वळ ९ अशी वाटणी केलेली आहे. ही विभागणी अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाहता किती तरी