३४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सरकारने दिलेला हा निर्णय इतर बाबतीत जरी अपुरा असला तरी ज्यांना
स्वतंत्र मतदार संघ पाहिजे त्यांचे व ज्यांना संयुक्त मतदार संघ पाहिजे त्यांचे
असे दोघांचेही त्यात समाधान करण्याची व्यवस्था झालेली आहे आणि या दृष्टीने
पाहता व अस्पृश्य समाजापुरतेच बोलावयाचे झाल्यास हा निर्णय म्हणजे
तडजोडीच्या स्वरुपाचा (Compromise) आहे व दोन्ही पक्षाने त्याला मान्यता देणे
इष्ट आहे.
गांधीजीविषयी म्हणाल तर त्यांना पाहिजे तरी काय हेच स्पष्टपणे समजत
नाही. असे मानण्यात येते की, गांधीजी जरी स्वतंत्र मतदार संघाच्या विरूद्ध
असले तरी ते संयुक्त मतदारसंघ व राखीव जागा देण्याच्या विरूद्ध नाहीत, पण ही मोठी भूल आहे. आज त्यांचे मत काय बदलले असेल ते असो. पण लंडनमध्ये असताना अस्पृश्यांना हिंदूंपेक्ष। राजकीय असे वेगळे अगर स्वतंत्र अस्तित्व देणारी कोणतीच योजना आपल्याला पसंत नसल्याने त्यांनी अगदी स्पष्टपणे जाहीर केलेले होते. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासच नव्हे तर संयुक्त संघातील राखीव जागेच्या योजनेसही आपला प्राणांतिक विरोध असल्याचे त्यांनी लंडनला जाहीरपणे बोलून दाखविले होते. सार्वत्रिक मताचा अधिकार व सर्वसाधारण निवडणुकीत ते मत देण्याचा हक्क यापलिकडे अस्पृश्यांच्या खास हितरक्षणार्थ त्यांना कोणतीही कायदेशीर सवलत देण्यास गांधीजी तयार नव्हते. अशातङ्हेचे धोरण त्यांनी तेथे असताना आरंभी स्वीकारले होते. पुढे माझ्याशी वाटाघाट करताना माझ्या समजुतीसाठी एक योजना त्यांनी शेवटी सादर केली. त्यांची ही योजना निरूपयोगी तर होतीच होती.पण तिलासुद्धा कायद्याचे स्वरूप अगर पाठिंबा देण्यास त्यांची तयारी नव्हती.
गांधीजींच्या या योजनेप्रमाणे अस्पृश्य वर्गातील उमेदवाराने निवडणुकीसाठी उभे राहावे. उच्चवर्गातील दुसरेही उमेदवार अर्थात त्याच जागेकरता उमेदवार म्हणून उभे राहतील. पुढे निवडणूक होऊन तिच्यात अस्पृश्य उमेदवार निवडून आला नाही म्हणजे त्याने वाटल्यास या निवडणुकीच्या निकालाविरूद्ध अर्ज करावा. या अर्जाप्रमाणे, ' केवळ अस्पृश्य वर्गीय म्हणून हा उमेदवार निवडून आला नाही ' असा जर त्याला न्यायाधिशाकडून निकाल मिळाला तर गांधीजी म्हणाले की, निवडून आलेल्यापैकी एखाद्या उच्चवर्णीय हिंदूने आपल्या जागेचा राजीनामा द्यावा अशी मी व्यवस्था करीन. मग पुन्हा या पराभूत अस्पृश्य उमेदवाराने अगर वाटल्यास दुसऱ्याने निवडणुकीला पुन्हा उभे रहावे ; व पुन्हा तो पडल्यास त्याने वाटल्यास प्रथम केला होता तसाच अर्ज वगैरे करून व तसाच निर्णय मिळवून पुन्हा निवडणुकीची ही शर्यत खेळावी. याप्रमाणे गांधीजींची