माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . ... ... मला पर्वा नाही ३४७
ही योजना म्हणजे पुन्हा पडा व पुन्हा उभे राहा, अशा प्रकारचा एक पोरकट खेळच होता ! गांधीजींची ही योजना मी आज प्रकट करण्याचे कारण इतकेच की, संयुक्त संघ व राखीव जागा अस्पृश्यांनी स्वीकारल्यास गांधीजींच्या सद्सद्विवेक- बुद्धीचे समाधान होईल असे जे पुष्कळांना वाटते ते कसे निराधार आहे हे सर्वांच्या ध्यानी यावे. गांधीजींनी आता एखादी नवी योजना तयार केली असल्यास ती त्यांनी आधी सादर करावी असा मी जो आग्रह धरला आहे तो एवढ्याचसाठी होय. गांधीजींचे जुने म्हणणे व जुनी योजना काय आहे ते सारे मला माहीत आहे व त्याला काय उत्तर द्यावयाचे तेही मी देऊन ठेविले आहे. त्या जुन्या गोष्टीचा काथ्याकूट करीत बसण्यात अर्थ नसल्यामुळे गांधीजींनी आपले नवे म्हणणे असल्यास ते सादर करावे असा माझा आग्रह आहे.
गांधीजी अगर काँग्रेस यांना जे योग्य व न्यायाचे दिसेल तेच अस्पृश्य समाजाच्या बाबतीत घडेल या नुसत्या शाब्दिक आश्वासनाचा मला स्वीकार करता येणे शक्य नाही हे मी प्रथमतःच सांगून ठेवतो. माझ्या अस्पृश्य बांधवांच्या हितसंरक्षणासारखा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न नुसत्या शाब्दिक आश्वासनावर व कागदी करारनाम्यावर विसंबून ठेवण्यास मी तयार होणे शक्य नाही. गांधीजी महात्मा असले तरी ते काही अमर नाहीत, अगर सर्वव्यापी नाहीत व काँग्रेसही वरच्या वर्गाच्या वैभवासाठी, गोरगरीब वर्गांना पायदळी व आपल्या हुकमतीखाली ठेवू पाहणारी अशी एक अरिष्टकारी संस्था नाही असे जरी मानले तरी तिचे मोठेपण व वजन कायम टिकणारे आहे असेही मुळीच नाही. अस्पृश्यता नष्ट करावी व अस्पृश्य जनतेला हिंदू समाजात आत्मसात करून घ्यावे म्हणून प्रयत्न करणारे उदंड महात्मे या भूमीत आतापर्यंत जन्मून गेले, पण त्यापैकी कोणालाही यश आले नाही. अनेक महात्मे अवतरले व अनेक निमाले पण अस्पृश्य मात्र
अस्पृश्यच राहिले.
हिंदू सुधारकांच्या सुधारणेची गती सरड्याच्या धावेप्रमाणे कशी मर्यादित आहे व त्यांचा विश्वास कसा अवसानघातकीपणाचा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव महाड व नाशिकला जे प्रकार घडले त्यावरून मला आलेला [आहे. ] असे असल्यामुळे अस्पृश्यांचे जे निःपक्षपाती व विचारी हितचिंतक आहेत ते हिंदूतील अशा या अवसानघातकी सुधारकांच्या हाती अस्पृश्यांचे भवितव्य निर्धास्तपणे सोपवा [असा ] सल्ला कधीही देणार नाहीत. आपल्या जातभाईचे मन दुखवू नये अगर त्यांचा रोष होऊ नये म्हणून जे सुधारक ऐन आणीबाणीच्या [वेळी ] [आपल्या ] [तत्त्वाशी ] [बेईमान ] होतात त्यांचा अस्पृश्यांना मुळीच उपयोग [नाही. ]