१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 392

३४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अशी वस्तुस्थिती असल्यामुळे माझ्या लोकांच्या हितार्थ कायदेशीर संरक्षण

बंधनाचा आग्रह धरणे मला भागच आहे. जातिविषयक निर्णय बदलला जावा

असा गांधीजींचा जर आग्रह असेल तर त्यांनी दुसरी योजना सादर केली पाहिजे

व आज जे काही अस्पृश्यांना मिळाले आहे त्यापेक्षा आपल्या या योजनेत अस्पृश्यांचे

अधिक हित आहे व ते हित अंमलात येण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर तरतूद त्या योजनेत आहे असे त्यांनी सिद्ध करून दाखविले पाहिजे. मला आशा वाटते की, गांधीजींनी जो निर्वाणीचा मार्ग धरला आहे तो ते सोडून देतील. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात हिंदू समाजाचे अहित करावे असा आमचा बिलकूल हेतू नाही. आमचे भवितव्य आमच्या हाती असावे. स्पृश्य हिंदुंच्या खुषीवर अगर त्यांच्या गोड लहरीवर आमचे भवितव्य पूर्वीप्रमाणे सर्वस्वी अवलंबून असू नये या एकाच हेतूने प्रेरित होऊन आम्ही ही मागणी केलेली आहे. चुका अगर पाप करण्याचा देखील आम्हाला अधिकार आहे असे इंग्रज राज्यकर्त्यांना उद्देशून गांधीजी म्हणतात. आम्हालाही तो अधिकार आहे व असला पाहिजे एवढेच आम्ही गांधीजींना सांगू इच्छितो आणि आमचा अधिकार हिरावून घेण्याचा ते प्रयत्न करणार नाहीत अशी आम्ही अपेक्षा करतो.

अन्नत्याग करून प्राण समर्पण करण्याची आपली दुर्धर प्रतिज्ञा त्यांनी दुसऱ्या एखाद्या थोर कार्यासाठी राखून ठेवावयाची होती. हिंदू व मुसलमान अगर स्पृश्य व अस्पृश्य या वर्गामधील दंगे धोपे अगर रक्तपात थांबविण्यासाठी गांधीजी जर अशी घोर प्रतिज्ञा करते तर तिचे स्वाभाविकत्व व महत्त्व मी समजू शकलो असतो. या आजच्या प्रतिज्ञेमुळे अस्पृश्य समाजाचे हित होईल अगर त्यांच्या दु:खाचा भार कमी होईल असे मुळीच नाही. गांधीजींना या परिणामाची जाणीव असो वा नसो पण त्यांच्या कृत्याचे पर्यवसान शेवटी अत्याचारात होईल. सर्व देशभर अस्पृश्य जनतेचा त्यांच्या हिंदू अनुयायांकडून व चाहत्यांकडून अनन्वित छळ होईल, पण या जबरदस्तीने ते हिंदू समाजाला चिकटून न राहता उलट चिडून दूर मात्र जातील. तुम्हाला हिंदू समाज पाहिजे की राजसत्तेचा हिस्सा पाहिजे असा जर प्रश्‍न गांधीजींनी अस्पृश्यांना विचारला तर मला खात्री आहे क, हिंदू समाजा- पेक्षा राजकीय सत्तेचेच आम्हाला अधिक महत्त्व वाटते असे त्यांना बिनचूक सांगण्यास व अशातऱ्हेने आत्महत्येच्या प्रतिज्ञेपासून त्यांना वाचविण्यास अस्पृश्य जनता एकदम तयार होईल. या सर्व गोष्टींचा या अशा परिणामाच्या दृष्टीने गांधीजी जर शांतपणे विचार करतील तर अशा उपायांनी आपला होणारा हा जयजयकार अगर आपल्या प्रतिज्ञेची होणारी ही विजयशाजी पूर्तता संपादन करण्याच्या अगर प्राप्त करून घेण्याच्या किंमतीची अथवा लायकीची आहे असे गांधीजींनासुद्धा वाटेल की नाही याबद्दल मला शंका वाटते.