३५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
न सांगताही समजण्यासारखे आहे. काही झाले तरी स्पृश्य हिंदुंच्या हवाली माझ्या लोकांचे भवितव्य सोपविण्यात मी कदापिही कबूल होणार नाही. “ *
““ अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळाल्यास मी माझा प्राण पणास लावीन ही आपली घोषणा ता. २० सप्टेंबर १९३२ पासून प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे महात्माजींनी ठरविल्यामुळे अखिल हिंदुस्थानातील हिंदू पुढाऱ्यांची तातडीची परिषद ता. १९ सप्टेंबर १९३२ रोजी भरविण्याचे ठरले. म. गांधींसारख्या हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ मानिलेल्या पुढान्याचा प्राण पणास लागलेला पाहताच बनारसहून पंडित मालवीयजी मुंबईस आले. राजेंद्रप्रसाद, सी. राघवाचार्य, पंडित कुंझरु, डॉ. मुंजे, टी. प्रकाशम, डॉ. चौथिराम, स्वामी सत्यानंद, मि. अणे वगैरे निरनिराळ्या प्रांतांचे प्रतिनिधी हजर राहिले. अस्पृश्य समाजापैकी रा. ब. एम. सी. राजा, गवई, मि. शिवराज, मि. जगन्नाथम, मि. धर्मलिंगम, मि. मंडल वगैरे परप्रांताची मंडळी आली होती. मुंबई प्रांतातफे सर चुनिलाल, डॉ. आंबेडकर, डॉ. सोळंकी, हिराचंद वालचंद, सर सेटलवाड, सर माडगावकर, सर पुरूषोत्तमदास, श्री. देवधर, मि. नटराजन, रा. ब. वैद्य, डॉ. देशमुख, दळवी, सुभेदार, शेट बिर्ला, मि. करंदीकर, सावरकर, शिवतरकर, पी. बाळू निकाळजे वगैरे मंडळी हजर होती. भगिनीवगतिफे मिसेस कमला नेहरू, पेरनी कॅप्टन, मोशोन कॅप्टन, सौ. अवंतिकाबाई गोखले, मिसेस अन्नपूर्णाबाई देशमुख, रतनबेन मेहता, मिस नटराजन वगैरे हजर होत्या.
सभेचे ठिकाण '' इंडियन मर्चन्टस् हॉल “ हे ठरविले होते. ह्या परिषदेवर म. गांधींच्या जीविताचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे परिषदेमधील एकंदर वातावरण फारच गंभीर स्वरुपाचे दिसत होते. ह्या परिषदेची सारी भिस्त डॉ. आंबेडकर यांच्याच धोरणावर अवलंबून होती. डॉ. आंबेडकर परिषदेला नक्की हजर राहणार असे कळताच परिषदेच्या चालकांना व परिषदेला हजर असलेल्या पुढारी मंडळींना एक प्रकारचे समाधान वाटले. परिषदेचा नक्की कार्यक्रम प्रथम काहीच ठरविलेला नव्हता.
प्रत्येक पक्षातील पुढाऱ्यांमध्ये एकप्रकारची खळबळ उडालेली दिसत होती. कोण काय बोलतो आणि परिषदेच्या हेतूला अनुसरुन कोणत्या प्रकारची तडजोड होणे शक्य आहे इकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिलेले होते. परिषदेच्या कार्यक्रमाला उपयोगी पडण्यासाठीचे डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट आणि निर्भीड म्हणणे सर्व वर्तमानपत्रांना जाहीरनाम्याच्या द्वारे कळविले होते. डॉक्टरांचे ' स्टेटमेंट ' वाचून जमलेल्या पुढाऱ्यांना पुढील कामकाजाची रुपरेषा आखण्यास व विचार करण्यास सुलभ झाले होते.
१ जनता : २४ सप्टेबर १९३२.