१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 395

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . ..... मला पर्वा नाही ३५१

परिषदेची सुरवात होण्यापूर्वी श्री. हिराचंद वालचंद यांनी एकंदर कार्याची अंधुक रुपरेषा सांगून पंडित मालवीयजींना अध्यक्षस्थान स्वीकारण्यास विनंती केली. पंडितजींच्या चेहऱ्यावर एकप्रकारची गंभीर छटा पसरली होती. ह्या परिषदेचे कार्य जितके महत्त्वाचे होते तितकेच ते गंभीर स्वरुपाचे होते. पंडितजींनी भाषणास सुरवात केली आणि सर्व पुढाऱ्यांना ह्या बिकट परिस्थितीतून सुलभ असा तडजोडीचा मार्ग शोधून काढण्याची आवश्यकता सांगितली. म. गांधींचे प्राण वाचविणे हे एक ध्येय पुढे ठेवून काही तरी उभयपक्षास मान्य होणारी योजना निर्माण होईल, अशा आशयाचे विचार प्रगट करण्याविषयी विनंती केली.

पंडितजींच्या विनंतीवरून प्रथम डॉ. आंबेडकर बोलावयास उठले. त्यांनी आपले प्रामाणिकपणाचे मत कोणत्याही भीडेस बळी न पडता परिषदेपुढे मांडले. त्यांनी आपली बाजू परिषदेपुढे मांडताना सांगितले की,

“ ह्या परिषदेच्या कार्यक्रमावरुन पाहता ही परिषद भरविण्याचे प्रयोजन आहे, असे मला वाटत नाही. आमच्या मागण्यांना म. गांधींचा विरोध असून त्याकरिता त्यांमी आपले प्राण पणास लाविले आहे. म. गांधीजींचे मौल्यवान प्राण वाचविले जावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे, परंतु आपले प्राण पणास लाविण्यापूर्वी गांधीजींनी दुसरी एखादी स्पष्ट योजना प्रथम जनतेपुढे मांडावयास पाहिजे होती. आजच्या परिस्थितीचा एकंदर विचार करता मला असे स्पष्टपणे वाटते की, गांधीजींच्या नवीन योजनेशिवाय कोणत्याही प्रकारचे तडजोडीचे मार्ग फोल आहेत आणि अगदी उघडपणे सांगायचे म्हणजे यापुढे ठरवावयाचे असे काहीच राहिलेले नाही. या परिषदेने कितीही काथ्याकूट केला तरी म. गांधींचे खरे म्हणणे काय आहे हे प्रथम अगदी स्पष्टपणे कळल्याशिवाय मला तरी काहीच नवीन मार्ग दिसत नाही आणि मी तुम्हा सर्वाना बजावून सांगतो की, या परिषदेच्या चालकांच्या किंवा येथील कोणाही पुढाऱ्यांच्या योजनेला मी बिलकूल बांधलेला नाही, फक्त म. गांधींचे म्हणणेच मी विचारात घेणार आहे. त्यांची योजना मला कळल्याशिवाय मी तरी उत्तर काय देणार ? त्यांचे म्हणणे काय आहे हे अगोदर आणा म्हणजे मी पुढे विचार करीन. तसेच त्यांचे जे काही म्हणणे असेल ते तुम्हांपैकी, स्पृश्य पुढाऱ्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मजपुढे आणिले तरच मी त्याचा विचार करीन. कोणाही अस्पृश्य पुढाऱ्यांच्या वतीने आलेल्या त्यांच्या योजनेचा मी केव्हाही स्वीकार करणार नाही, हे प्रथम बजावून सांगत आहे. म. गांधींचे प्राण वाचविण्यासाठी मी माझ्या बांधवांच्या न्याय्य हक्काला हरताळ फासण्यास कारणीभूत होणार नाही. “

डॉ. आंबेडकरांचे भाषण फारच जोरदार व परिणामकारक असे झाले. त्यांच्या भाषणानंतर रा. ब. राजांचे भाषण झाले. त्यांनीही म. गांधीजींच्या नवीन