माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . ....... मला पर्वा नाही ३५९
तुरुंगातून आला. त्याप्रमाणे मंडळी एक तास उशिराने म्हणजे पाच वाजता येरवड्याच्या तुरुंगात गेली. महात्मा गांधी एका आंब्याच्या झाडाखाली उघड्या जागेत एका खाटेवर पडले होते. सभोवती त्यांच्या शिष्यवर्गापैकी महादेव देसाई, सरोजिनी नायडू, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, बिर्ला, सर चुनिलाल मेथा वगैरे मंडळी बसली होती. प्रथमतः सर तेजबहादूर सप्रू यांनी महात्मा गांधींना नॅशनल हॉटेलमध्ये घडलेला वृत्तांत सांगितला व डॉ. आंबेडकर हे स्वतः जे सांगावयाचे ते सांगतील असे सूतोवाच केले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी जवळ जवळ १.३० तास भाषण केले व आपली नवी योजना व कॅम्युनल अवार्ड या दोहोंच्या गुणदोषाचे विवेचन केले. या वांदविवादातून एक मोठी आश्चर्याची गोष्ट बाहेर आली. ती ही की, म. गांधींनी प्राथमिक निवडणुकीची घटना अमान्य असण्याऐवजी सर्वस्वी मान्य होती हे त्यावेळी त्यांनी स्पष्ट करून सांगितले ; इतकेच नव्हे तर स्वतंत्र मतदार संघात जेवढे चांगले होते तेवढे घेतले याबद्दल मी तुमचें अभिनंदन करतो असेही ते म्हणाले व थोडक्याच जागांना लागू करण्याऐवजी तुम्हाला कौन्सिलात मिळणाऱ्या सर्व जागांना सर्रास लागू करा अशी त्यांनी शिफारस केली. त्यानंतर पहिल्या दिवशीची वाटाघाट संपली.
महात्माजींच्या प्राथमिक निवडणुकीच्या तत्त्वाला मिळालेल्या संमतीमुळे दुपारी पसरलेले निराशेचे वातावरण नाहीसे होऊन समेटाची आशा दिसू लागली.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पुण्याच्या शेठ शिवलाल मोतिलाल यांच्या बंगल्यावर बाकी राहिलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या मागणीची वाटाघाट करण्याचे ठरले. वाटाघाटीत वादाचे प्रश्न असे चार होते, ते असे :- (१) प्राथमिक निवडणुकीमध्ये पॅनेल किती लोकांचे असावे. (२) मध्यवर्ती कायदेमंडळात अस्पृश्य .वर्गाचे प्रतिनिधी किती असावेत. (३) प्रांतिक कायदेमंडळातील अस्पृश्यांना किती जागा देण्यात याव्या. (४) राखीव जागेची सवलत किती दिवस राहावी व ती काढावयाची झाल्यास कोणत्या अटीवर काढावयाची वगैरे
प्रश्न होते.
शुक्रवार २३ सप्टेबर १९३२
वरील प्रश्नांचा विचार करण्याकरिता पुणे येथील राजा बहादूर शिवलाल मोतीलाल यांच्या बंगल्यावरती शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कमिटीची बैठक भरविण्यात आली. प्रथमतः प्राथमिक निवडणुकीत उभे राहिलेल्या किती माणसांना अखेर निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असावा या विषयावर चर्चा झाली. कमिटीतील हिंदू सभासदांचा प्राथमिक निवडणुकीत उभे राहिलेल्या