३६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मुख्य प्रधानांची मावशी ससेक्स परगण्यातील आर. डिगले या गावी वारली होती. तिच्या प्रेतयात्रेस मॅकडोनाल्ड साहेब २४ ला निघाले होते. पण हिंदुस्थानातून आलेल्या तारा पाहून त्यांनी आपले जाणे रहित केले आणि पुणे कराराचा विचारविनिमय मंत्रिमंडळाबरोबर दोन दिवस करून त्यांनी मंत्रिमंडळाची संमती परत तारेने व्हाईसरॉय, वगैरेंना २६ तारखेस कळविली. . तारीख २६ सप्टेंबरला हिंदुस्थान सरकारचे गृह चिटणीस (होम मेंबर) मि. हेग यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात भाषण करून सरकारने हा करार मान्य केल्याचे जाहीर केले.
सरकारने कराराला आपली संमती दिल्याचे पत्र इन्स्पेक्टर जनरल कर्नल डॉयल यांना पाठविले व ते त्यांनी गांधीजी आणि इतर पुढारी यांना मंगळवारी २७ तारखेला तिसऱ्या प्रहरी सव्वा चार वाजता दाखविले. गांधीजींनी आपला उपास सोडावा, असे सर्वांना वाटले. या सरकारी संमतीला अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला पाहिजे, असे गांधीजी म्हणाले. हे सर्व पुढारी मुंबईला गेलेले होते आणि त्यांची पुन्हा सभा भरवावी लागेल व त्यात एक दोन दिवस जातील. या कराराला त्यांनी अगोदरच संमती दिलेली आहे व त्यावर सह्या केलेल्या आहेत. तेव्हा पुनः त्याबद्दल हा प्रश्न विचारात घेण्याची जरूरी नाही, असा पक्ष पंडित हृदयनाथ कुंझरू यांनी गांधीजींच्यापुढे मांडला
व त्याला श्री. राजगोपालाचारींनी पाठिंबा दिला. मग गांधीजी उपास सोडायला
तयार झाले. कर्नल डॉयल म्हणाले ' कस्तुरबा गांधींच्या हातून फळांचा रस प्या व उपास सोडा ' गांधीजींनी संमती दिली. गांधीजींच्या सभोवती पाण्याचा सडा शिपडण्यात आला. रवीन्द्रनाथ टागोर यांनी आपल्या गीतांजलीतील एक भक्तीगीत म्हटले. भगवद्गीतेतील श्लोक काहींनी म्हटले. तेथे जमलेल्या सुमारे २०० लोकांनी ' वैष्णव जन तो तेणे कहिये ' हा गांधीजींचा आवडता संत नरसी मेहतांचा अभंग म्हटला व कस्तुरबांनी संत्र्याच्या रसाचा प्याला गांधीजींना दिला. ते रस प्याले ब त्यांनी उपास सोडला.” *
१ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ५ वा, पृ. ५६, ५७, ६१.