२५-९-१९३२ पुणे करारनामा बंधनकारक समजून स्पुश्यबंधुंनी कृती करावी - Page 411

५७
पुणे करारनामा बंधनकारक समजून
स्पृश्य बंधुंनी कृती करावी

पुण्याला म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधे तडजोड होऊन एक नवीन करारनामा तयार करण्यात आला. हा सर्व हिंदू पुढारी मंडळींना पसंत पडताच गेल्या शनिवारी करारनाम्यावर अस्पृश्य व स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांच्या सह्या झाल्या. हा करारनामा पास झाल्यानंतर मुंबईत पुन्हा सर्व हिंदू पुढारी जमले व रविवार तारीख २५ सप्टेंबर १९३२ रोजी कोर्टातील इंडियन मर्चन्टस्‌ असोसिएशनच्या हॉलमध्ये. मुंबई नागरिक इमर्जन्सी कौन्सिल तर्फे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सभा भरून कराराला सर्वानुमते संमती देण्यात आली. |

प्रथमत: परिषदेचे अध्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात तडजोडीला ज्या ज्या पुढाऱ्यांचे जिवाभावाचे सहाय्य झाले त्या त्या मंडळीचे त्यांनी अंतःकरणपूर्वक आभार मानले. तथापि, अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. आंबेडकर यांचे आभार प्रामुख्याने मानणे अगदी योग्य आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय ही तडजोड होणे कठीण होते. करारनाम्यातील कलमांचा विचार करता स्पृश्य हिंदूंवर ती प्रत्यक्ष कृतीत पार पाडून दाखविण्याची मोठी

जबाबदारी आहे.

.पंचवीस लाखांचा फंड

अस्पृश्यता निवारण्यासाठी मुख्यतः पैशाची अत्यंत जरूरी आहे. सर्व देशभर जागृतीचे कार्य करण्यासाठी पैशाशिवाय सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील. या कार्याकरिता आपण एक लहानशी कमिटी नेमून या कमिटीतफे निदान २५ लाख रूपये फंड उभारण्यात आला पाहिजे आणि पुढील तीन-चार महिन्यात प्रत्यक्ष कार्य करून आपल्या हिंदू धर्माचे तेज वाढविणे, आपल्या दलित बांधवांना समानतेचे सर्व हक्क देणे आणि आपली अंतःकरणे शुद्ध करून उच्चनीचतेचा भाव समूळ नाहीसा करणे इत्यादि गोष्टी तात्काळ झाल्या पाहिजेत. आपल्या समाजातून अस्पृश्यता समूळ नाहीशी कंरण्यासाठी महात्माजींनी आपला प्राण पणास लाविला होता ही गोष्ट सर्वांनी पूर्णपणे लक्षात ठेवावयास पाहिजे.

जनता : १ ऑक्टोबर १९३२.