३६८ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पंडितजींचे हृदयस्पर्शी भाषण झाल्यावर पुण्याला झालेल्या करारनाम्यास संमती देणारा मुख्य ठराव शेठ मथुरादास वसनजी खिमजी यांनी पुढे मांडिला. ठराव मांडताना ते म्हणाले की, पुण्याला झालेल्या करारनाम्याला ब्रिटिश सरकारने आता आपली संमती द्यावयास कोणतीच हरकत नाही. तरी सरकारने म. गांधी यांच्या बिकट अवस्थेतील प्रकृतीचा विचार करून तात्काळ मान्यता असल्याचा विद्युत संदेश पाठवून द्यावा.
ठरावाला अनुमोदन देण्याकरिता सर तेजबहादूर सप्रू हे बोलावयाला उठले. ते म्हणाले की, या करारनाम्याचे सारे कार्य पंडित मालवीयजींच्या अध्यक्षतेखाली झाले आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पंडितजींनी आपला कट्टर धर्मनिष्ठपणा बाजूला ठेवून बदलत्या काळानुसार वागण्याचे जे मनोधैर्य दाखविले ते कितीतरी पटीने अलौकिक आहे आणि आपण सर्वांनी आजच्या परिस्थितीत असेच धडाडीचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. तसेच ह्या तडजोडीच्या यशस्वीतेचे बरेच श्रेय डॉ. आंबेडकर यांना दिले पाहिजे. त्यांनी आपल्या समाजाच्या न्याय्य हक्कासाठी झगडण्यात जे धैर्य व जो करारीपणा दाखवला तो अभिनंदनीय असाच होता. त्यांच्या धैर्याकडे पाहता ते अस्पृश्यांचे नव्हे तर हिंदुस्थानचे भावी खरे निधड्या छातीचे पुढारी होतील यात तिळमात्र शंका वाटत नाही. ब्रिटिश सरकारच्या कम्यूनल अवार्डपेक्षा ह्या नवीन कराराने अस्पृश्य वर्गाचे अधिकच हित झाले. तरी आपण सर्वानी यापुढे सहकार्याने वागून अंगिकारलेल्या कार्यामध्ये यश मिळविण्याचा कसून प्रयत्न केला पाहिजे.
डॉ. आंबेडकर भाषण करावयास उभे राहाताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, |
थोड्याच दिवसापूर्वी माझी बिकट परिस्थिती व आजचा आनंदाचा समय याचा विचार केल्यास हे सारे स्वप्नवत असे दृश्य दिसले. एकीकडे मला म. गांधींचे प्राण वाचवावयाचे होते तर दुसरीकडे मला माझ्या समाजबंधुंच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण जिवापाड करावयाचे होते. हा दुहेरी पेच यशस्वीरीतीने सुटला जाईल अशी मला बिलकूल शंका वाटत नव्हती. परंतु एकंदर भयानक व जबाबदारीची परिस्थिती जाणून सर्व हिंदू पुढाऱ्यांनी जे सारासार विचारसरणीचे व सहकार्याचे धोरण स्वीकारले त्यामुळे ह्या बिकट प्रश्नातून समाधानकारकरित्या बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकला आणि यामुळे मला खरोखर अत्यानंद होत आहे. या लढ्याच्या वाटाघाटीतून पार पडण्यास मुख्यतः म. गांधीच कारणीभूत झालेले आहेत. मला मोठे आश्चर्य वाटते की, माझ्या सर्व मागण्यांना म. गांधींनी मान्यता देऊन उलट माझेच अभिनंदन केले. म. गांधींनी ही जी एकप्रकारची तडजोड मान्य केली ती दुसऱ्याच राऊंड टेबल परिषदेच्या प्रसंगी मान्य केली असती