५८
देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही
पुण्याच्या तहनाम्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यास मुंबई येथील अखिल अस्पृश्य समाज अत्यंत आतुर झाला होता आणि अशी संधी केव्हा प्राप्त होईल म्हणून तो मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात होता व वरळी येथील रा. सावंत वगैरे काही तरूण मंडळीनी बुधवार, तारीख २८ सप्टेंबर १९३२ रोजी रात्रौ एक जाहीर सभा बोलावून ही संधी आणून दिली. सुमारे १० वाजता बाबासाहेब, सभेचे नियोजित अध्यक्ष श्री. देवराव नाईक व इतर मंडळी सभेत वरळी, बी. डी. डी. चाळीजवळील मैदानात दाखल झाली व लागलीच सभेच्या कामास सुरवात झाली. योग्य प्रकारे अध्यक्षांची निवड झाल्यावर अध्यक्ष श्री. देवराव नाईक यांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यांनी सांगितले की,
म. गांधींच्या घोर प्रतिज्ञेमुळे सबंध हिंदुस्थान देश हादरून गेला होता व त्यांच्या प्रतिज्ञेचे स्वरूप इतके भयंकर होते की, अस्पृश्यांचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म. गांधींच्या म्हणण्यास रूकार दिल्याशिवाय त्यांचे जीवित सुरक्षित नव्हते आणि तशी संमती देणे म्हणजे इतक्या परिश्रमाने अस्पृश्यांना जे काही स्वसंरक्षणार्थ मिळाले होते त्याच्यावर तिलांजली सोडणे होय आणि अनुमती न देणे म्हणजे महात्माजींचे प्राण गमविण्याची जबाबदारी घेणे होय. अशा विलक्षण परिस्थितीत अस्पृश्य समाज व विशेषतः स्वतः डॉ. बाबासाहेब हे सापडले होते. पण अस्पृश्यांच्या सुदैवाने ते या भयंकर दिव्यातून सुखरूप तावून, सुलाखून या दोन्ही गोष्टी साधून बाहेर पडले आणि हा सुयोग एक प्रकारे पददलित वर्गाच्या उज्वल भविष्यकालाचे शुभ चिन्हच होय. आज अस्पृश्य वर्गास इतिहासात पूर्वी कधीही न मिळालेले असे हक्क प्राप्त झाले आहेत ही गोष्ट खरी. पण आज हिंदू समाजात वावरत असलेली अस्पृश्यता नष्ट झाली म्हणजे त्या हक्काचे सार्थक झाले अशी भ्रामक कल्पना मनात न बाळगता, सर्व अस्पृश्य समाज, हिंदू समाजातील विषमतेस मूठमाती देऊन पूर्ण समानतेच्या भक्कम पायावर स्थिर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही अखिल हिंदू समाजास त्याने आजच्या आज द्यावी. अध्यक्षांनी आपले भाषण संपविण्यापूर्वी एक प्रतिज्ञा केली की, 'आजपासून चार महिन्याच्या आत जनता पत्राचे पाच हजार वर्गणीदार झाल्याशिवाय आपण संपादकाची जागा स्वीकारणार
नाही.'
जनता : ८ ऑक्टोबर १९३२,