२८-९-१९३२ देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही - Page 416

३७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्यांना एकही जागा मिळाली नव्हती. तेथे त्यास ८ जागा मिळाल्या. शिवाय इतर प्रांतातील अधिक जागा मिळाल्या त्या वेगळ्याच. दुसरा फायदा मध्यवर्ती कायदे कौन्सिलात अस्पृश्यांच्या जागेचे प्रमाण शेकडा १८ ठरविण्यात आले, हा होय. या प्रश्‍नासंबंधाने मुख्य प्रधानांच्या निवाड्यात काही नामनिर्देश नव्हता. मुख्य प्रधानांच्या निवाड्यात अस्पृश्यास अत्यंत हानिकारक व धोक्याचे असे एक किल्मिष राहिले होते आणि त्या सर्व सवलती २० वर्षानंतर आपोआप नाहीशा व्हावयाच्या होत्या, हे होय. २० वर्षात काही इकडील दुनिया तिकडे होणार नव्हती व या अल्पावधित हजारो वर्षे चालत आलेले अन्याय नष्ट झाले नसते. तेव्हा सर्वसाधारण हिन्दू समाजाचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय अस्पृश्यांस मिळालेल्या विशेष सवलती काढून घेणे म्हणजेच वाढीस लागलेल्या झाडाची अकाली खच्ची करणे होय. नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे. आता असे ठरले आहे की, हिंदू समाज व अस्पृश्य यांच्या परस्पर संमतीनेच या सवलती दूर होतील. हिंदू समाजाने आपल्या प्रत्यक्ष कृतीने अस्पृश्यांचा विश्वास संपादन केला तर या सवलती अस्पृश्य आपणहून सोडतील. नाही तर ही व्यवस्था चालू राहील. हे सर्व ठीक झाले. पण मिळालेल्या फायद्याचा तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपयोग करून घेणार नाही तर आंधळ्यापुढे रत्न ठेवण्यासारखी तुमची स्थिती होईल. जे मिळाले आहे त्याचा तुम्ही योग्य उपयोग केला पाहिजे. तुम्हास किती सत्ता मिळाली आहे याची योग्य कल्पना येण्याकरिता स्वराज्यातील भावी मुंबई कायदे कौन्सिलाचे चित्र तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणा. २०० जागांपैकी कोणत्याही पक्षाकडे निदान ११५ जागा असल्याशिवाय त्यास राज्यकारभार चालविता येणार नाही. या प्रांतात सर्वात अधिक जागा हिंदूंच्या वाट्यास आल्या आहेत ; आणि त्या जवळ जवळ १०० आहेत. या शंभरांना तुमच्या १५ शिवाय राज्यकारभार हाकता येईल का ? मुसलमान वगैरे इतर लहान गटासंबंधी तर बोलावयासच नको. तेव्हा तुमच्या हातात अलौकिक शक्ती आली आहे तिचा उपयोग तुम्ही आपली आर्थिक उन्नती करून घेण्याकरिता केला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची व मननीय सूचना तुम्हास द्यावयाची आहे. आज जिकडे तिकडे तुमच्याकरिता देवालयाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न करणाऱ्यांच्या शुद्ध हेतूबद्दल मला शंका नाही परंतु .देवालयात जाण्यास मिळाले म्हणजे तुमचा उद्धार होत नाही, हे तुम्ही विसरता कामा नये. देवालयातील मूर्तीभोवती खेळणाऱ्या आध्यात्मिक भावनेपेक्षा. पोटाची खळगी कशी भरतील याची विवंचना तुम्हाला अगोदर बाळगिली पाहिजे. खाण्यास पुरेसे अन्न नाही, अंगभर वस्त्र नाही, शिक्षण घेण्याची सोय नाही, द्रव्याच्या अभावी