२८-९-१९३२ देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही - Page 417

देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही ३७३

औषध पाणी घेता येत नाही अशा दैन्यावस्थेत सापडलेला आपला समाज आहे. ही परिस्थिती पालटून आयुष्यातील आवश्यक असलेल्या सुखसोयी उपभोगण्यास मिळतील या ध्येयाने तुम्ही आपला पुढील कार्यक्रम आखला पाहिजे. मिळालेल्या राजकीय सत्तेचा उपयोग तुम्ही या दिशेने, केला पाहिजे. देवालयात जाण्याचे मार्ग मोकळे झाले, केवळ अस्पृश्यता दूर झाली. म्हणून मिळालेले हक्क गमावणे उचित होणार नाही. आपली आजची दैन्यावस्था ही दैवदुर्विलासाचे फळ आहे, ह्या खुळचट व आत्मवंचक कल्पनेला अजिबात फाटा द्या आणि माझी अशी पक्की खात्री आहे की, या भोळसर कल्पनांना झुगारून देऊन आपल्यातील प्रत्येक इसम राजकारणाकडे नजर ठेऊन राजकीय सत्तेचा योग्य उपयोग करून घेईल तर आपल्या समाजाची दुःखे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र ही की, तुम्ही जे पुढारी निवडाल व ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील. तुमचे हित व ज्यांचे हित एक असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा. दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील व दिशाभूल करतील. ते तुम्हास दगा दिल्याशिवाय

राहणार नाहीत. तरी या नामधारी पुढाऱ्यांपासून तुम्ही दूर रहा. यापुढे आपल्याला पुष्कळ कामे करावयाची आहेत. . आज स्थिर अशा आपल्याजवळ संस्था नाहीत. सर्व चळवळीचे केंद्रस्थान म्हणून एखादी स्वतंत्र जागा नाही किंवा हरएक काम करण्याकरिता माणसे नाहीत. या अडचणी दूर करण्याकरता २ लाख रुपयांचा निधी उभारण्याचा मी संकल्प केला आहे. वयात आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने या फंडात भर घातली पाहिजे आणि मला खात्री आहे की, तुम्ही मनात आणाल तर एकट्या मुंबईमध्ये तुम्ही हा फंड उभारू शकाल. या कामास लौकरच सुरूवात होणार आहे व तुम्ही सर्वानी एकदिलाने कंबर कसून या कामास हातभार लावला पाहिजे. तसेच तुम्ही जनता पत्राचा खप वाढविला पाहिजे. ते आपले मुखपत्र आहे. त्या पत्राद्वारे जनतेत स्फूर्ती उत्पन्न होणार आहे. तेव्हा ते पत्र स्वावलंबी करणे

तुमचे कर्तव्य आहे.

-याप्रकारे बाबासाहेबांचे सुमारे एक तास भाषण झाले. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द जमलेली मंडळी रत्नाप्रमाणे झेलीत होती. नंतर अध्यक्षांचे, बाबासाहेबांचे व इतर मंडळीचे आभार मानण्यात आले व सुमारे बार वाजता सभा

बरखास्त झाली.

७ © ७