८-१०-१९३२ भोळसट कल्पनांमुळे इहलोकातील खडतर आयुष्यक्रम कष्टमय झाला आहे - Page 418

५९
भोळसट कल्पनांमुळे इहलोकातील खडतर
आयुष्यक्रम कष्टमय झाला आहे

बेलासीस रोड इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चाळीजवळील मैदान रविवार ता. ८* ऑक्टोबर १९३२ रोजी रात्रौ १०-३० वाजता स्त्री-पुरुषांनी भरून गेले होते. सोशल सर्व्हिस लीगचे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. बापुसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी त्या दिवसाच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते. आपल्यास अध्यक्षपदाचा. मान दिल्याबद्दल सभेच्या चालकांचे मनःपूर्वक आभार मानताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विशाल विद्वत्तेने, अचल मनोधैर्याने व अद्वितीय पराक्रमाने जगन्मान्य झाले आहेत. त्यांच्या व्याख्यानाचे प्रसंगी आपल्यासारख्या साध्या समाजसेवकास अध्यक्षपदाचा मान देणे म्हणजे आपल्यावर ते एक संकट लादणे होय, पण दगडास देव करण्याची हिंदू लोकास सवयच आहे. तेव्हा तुम्ही तरी त्यास कसे अपवाद ठरणार ! आणखी थोडे ' समयोचित असे भाषण करून त्यांनी सभेच्या कार्यास सुरवात केली. या सभेतील मुख्य ठराव म्हणजे पुण्याच्या तहनाम्यास पाठिंबा देणे, तो श्री. सी. ना. शिवतरकर यास सभेपुढे मांडावयास सांगितला. रा. शिवतरकर हे पुण्याच्या तहनाम्यावर सही करणाऱ्यापैकी एक आहेत. डॉ. आंबेडकरांचा व हिंदू पुढाऱ्यांचा खल चालू असताना ते पुण्यास स्वतः हजर होते. त्यामुळे त्यांनी तहनाम्यातील कलमांवर चांगले भाषण केले. रा. चव्हाण व इतर वक्त्यांनी या ठरावास दुजोरा दिल्यानंतर तो टाळ्यांच्या गजरात पास झाला.

नंतर दुसरा ठराव रा. ब. बोले यांचे बिलास पाठिबा देण्याकरिता होता. तो रा. वनमाळी यांनी मांडला. मुंबईच्या म्युनिसीपल कॉर्पोरेशनच्या स्कूल कमिटीवर अस्पृश्यांचा खास प्रतिनिधी असणे कसे अवश्य आहे हे व्यवस्थितरीतीने त्यांनी विषद केले. या ठरावासही योग्यरीतीने दुजोरा मिळाल्यावर तो पास झाला. नंतर अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेबांस भाषण करण्याची विनंती केली. त्यांचे ' भाषण ऐकण्यास श्रोतृवृंद आधीच अतिशय उत्सुक. त्यात वरील दोन ठराव. मांडण्यात जास्त वेळ गेल्यामुळे ऐकणाऱ्यांची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत गेली होती. त्यांच्या भाषणात नाटकी आविर्भावास वाव नाही पण उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात चित्ताकर्षकता भरपूर व विचार प्रकर्षतेस अगडबंब शब्दांचा लेपही नाही, पण प्रत्येक विचार मालिका इतक्या सरळ व साध्या शब्दांत गुंफित केलेली.

जनता : शनिवार, १५ ऑक्टोबर १९३२.

* तारीख ९ ऑक्टोबर १९३२ असावी-संपादक.