६२
आपल्यातील भेद मोडणेच इष्ट
शुक्रवार ता. ४ नोव्हेंबर १९३२ रोजी रात्रौ ९ वाजता बालपाखाडी येथे गुजराती मेघवाळ व इतर सर्व अस्पृश्यांची जंगी जाहीर सभा भरविण्यात आली होती व त्या ठिकाणी “ गांधी-आंबेडकर करार अजरामर होवो, “ “ डॉ. आंबेडकर हेच आम्हा अखिल अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत,” " डॉ. आंबेडकर यांना अस्पृश्यांचा उद्धार करण्यास परमेश्वर उदंड आयुष्य देवो. “ अशा म्हणी व्यासपीठावर सर्व बाजूस लावण्यात आल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बरोबर नऊ वाजता डॉ. सोळंकी, शिवतरकर, गोविंद चव्हाण, सुभेदार सवादकर, फणसे, चित्रे बंधू व इतर पुढाऱ्यांबरोबर येऊन सभास्थानी हजर झाले. ते आल्याबरोबर “ डॉ. आंबेडकर झिंदाबाद “ चा ध्वनी सर्वत्र घुमू लागला. डॉ. आंबेडकर यांचा जय्ंजयकार एकसारखा पाच मिनिटे झाल्यावर श्रीयुत भाणजी राठोड यांनी, डॉ. सोळंकी साहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना आणली. तीस शिवराम चौहाण यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. सोळंकी साहेब प्रचंड टाळ्यांच्या गजरात अध्यक्षस्थानी विराजमान झाले. नंतर लक्ष्मण डी. सोळंकी डिप्रेस्ड क्लास वेलफेअर कमिटीचे प्रमुख यांनी मानपत्र वाचून दाखविले व रौप्य करंडकातून अध्यक्षांच्या हस्ते अर्पण केले. मानपत्रास उत्तर देताना डॉ. आंबेडकरसाहेब म्हणाले,
बंधु भगिनींनो !
तुम्ही मला जे मानपत्र दिले त्याचे महत्त्व मी सर्व ठिकाणी मला मिळालेल्या मानपत्रापेक्षा जास्त आहे असे समजतो व त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. आपण या चाळीमध्ये राहणारे लोक म्युनिसीपालिटीत काम करणारे आहात. याठिकाणी पुष्कळ वेळा खादी भक्त काँग्रेसचे अभिमानी म्हणविणारांनी येवून तुम्हाला उपदेश केलेला आहे. काँग्रेस हीच तुमचा उद्धार करील. तिला मदत करा. पण तेच खादीभक्त म्युनिसीपालिटीच्या कार्पोरेशनमध्ये आहेत. त्याठिकाणी त्यांनी तुमच्याकरिता काय केले आहे याचा विचार करा. पाच रुपये भरणारास मताचा अधिकार असावा असे ज्या ज्या वेळी ठराव आले ते सर्व ठराव गरीब गुरीबांचे कैवारी म्हणवून घेणारे पण श्रीमंतांच्या हिताकरिता प्राणापलिकडे जपणारे लोक म्हणजे हे खादीभक्त काँग्रेसवादी यांनी फेटाळून लाविले आहेत. तुमच्या राहण्याच्या खोल्यांची स्थिती सुधारण्याची किंवा तुम्हास मिळत असलेला अपुरा पगार वाढविण्याची या लोकांनी केव्हाही
जनता : १२ नोव्हेंबर १९३२.