३८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अनुयायांनी अस्पृश्यातील गारगोट्या व नदीतील दगड यांना शेंदूर फासून त्यांना जाणून बुजून पुढारी केले व माझी फसवणूक केली. अस्पृश्यांच्या खऱ्या पुढाऱ्यांची मला ओळखसुद्धा होऊ दिली नाही. असो. म्हणून मी जाताना आपणाला प्रेमाचे दोन शब्द सांगतो ते लक्षात ठेवा. - ते हे की, तुम्ही आपली एकी कायम ठेका, दुभंग होऊ देवू नका. जातीभेद, वर्गभेद, जिल्हाभेद हे वाढवू नका. माझ्या पश्चात डॉ.सोळंकी साहेब व माझ्या ऑफिसात माझ्याबरोबर काम करणारी माझी सहायकारी मंडळी यांच्या सहाय्याने वागा. इतरांच्या भुलथापा ऐकून सैरावैरा धावत सुटू नका. माझ्याबरोबर काम करणाऱ्या मंडळीच्या विरूद्ध लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न काही बुद्रुकांनी चालू ठेवला आहे हे मला माहीत आहे. तरीपण तुम्ही आपली मने विकारवश होऊ देऊ नका व मी येईपर्यंत ऐक्याने वागा. ऐक्याने वागल्यास आपले भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करण्यास इष्ट फलदायी होईल. तसेच मी काढलेल्या विनंती पत्राप्रमाणे आपण सर्वांनी बोर्डीग फंडास शक्य ती मदत करावी. यानंतर हारतुरे झाल्यावर डॉ. आंबेडकरांच्या जयजयकारात सभा आटोपली.