६४
दैवावर भरवसा ठेवून वागू नका,
जे करावयाचे ते मनगटाच्या जोरावर करा
शनिवार, ता. १८ फेब्रुवारी १९३३ रोजी कसारा मुक्कामी ठाणे जिल्हा परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. डॉ. आंबेडकर साहेब हे मुंबईहून मोटारीने रात्री ८ वाजता कसारा मुक्कामी आले. त्यांच्याबरोबर श्रीयुत शिवतरकर, दिवाकर पगारे व गणपतबुवा जाधव उफ मडकेबुवा आले होते. कसारा येथे बाबासाहेबांचे स्वागत करण्याकरिता कल्याण येथील समता सैनिक दलाचे व्हॉलंटीयर व आसपासच्या खेड्यातून आलेले प्रतिनिधी हजर होते. नासिकहून मेसर्स भाऊराव गायकवाड, के. बी. जाधव व लिंबाजीराव भालेराव व रोकडे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांची मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सभा मंडपात आल्यावर परिषदेच्या कामास सुरवात करण्यात आली. आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष शंकरनाथ बर्वे यांनी आलेल्या सर्व मंडळीचे स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकरसाहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना मांडली. तीस रा. रोकडे यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या प्रचंड गजरात
अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले.
डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
ठाणे जिल्ह्यात यापूर्वी मला येता आले नाही. त्यामुळे माझा आपल्याशी फारसा परिचय झालेला नाही. तो महंत शंकरदास बुवा यांनी घडवून आणला याबद्दल मी त्यांचा व ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींचा हा योग जुळवून आणल्याबद्दल फार आभारी आहे. मी याप्रसंगी फार थोडेच परंतु महत्त्वाच्या प्रश्नावर सूचनात्मक बोलणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल अशी आशा आहे. आज तुम्ही जे काही मिळविले आहे त्याचा विचार कराल तर प्रकार निराळाच दिसेल. महात्मा गांधी व सनातनी लोक यांच्याशी अस्पृश्यता नष्ट करण्याचे बाबतीत गेले आठ-दहा दिवस मी वाटाघाट करीत आहे. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारण करण्याकरिता मंदिरे खुली करण्याची व अस्पृश्यता धुवून काढण्याची चळवळ चालविली आहे. मंदीर प्रवेशाबाबत मी एक जाहीर पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मी स्पष्ट सांगितले आहे की, आमची अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता मंदीर प्रवेशाची जरूरच आहे असे नाही.
जनता : २५ फेब्रुवारी १९३३.