३८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आम्हाला हिंदू धर्मात समानता पाहिजे व चातुर्वर्ण्य नष्ट झाले पाहिजे तरच हिंदू धर्म आम्हास मानीत आहे असे आम्ही समजू व तरच हिंदू धर्म आम्हास मान्य आहे. हा महात्मा गांधी व माझ्यामध्ये मतभेद आहे. सनातनी चातुर्वर्ण्य काढण्यास तयार नाहीत, देवळे उघडण्यास तयार नाहीत. त्याबरोबर दुसरी बाजू अशी आहे की, या लोकांची सावली घेण्यास ते अद्याप तयार नाहीत. त्यांच्याबरोबर समानतेने वागणे व त्यांची हुकूमत चालवून घेणे त्यांना भाग पडेल. आपल्या उर्खितावस्थेस नुकतीच कोठे सुरुवात झालेली आहे. पूर्वी आपले लोक पोलीसमध्ये नसत पण आज अस्पृश्य माणसे पोलीसमध्ये नोकरीस आहेत. मॅट्रीक झालेली अस्पृश्यांची मुले पोलीस ट्रेनिगमध्ये शिकत आहेत. त्यांच्या हुकूमतीखाली इतर स्पृश्य लोक नोकऱ्या करू लागतील, याकरता आपल्यात अधिकारी वर्ग अधिकाधिक तयार झाला पाहिजे व सर्व समाजाचा दर्जा. वाढला पाहिजे. तरच आपल्यावर कोठे अन्याय घडणार नाही. आज कोणी एकादा डेप्युटी कलेक्टर, कोणी मामलेदार, पोलीस इन्स्पेक्टर झालेले विरळ विरळ दिसत आहेत व पुढे ही संख्या जास्त वाढणार आहे. अशारीतीने आपले लोक अधिकारी झाल्यावर वरच्या वर्गाच्या लोकांचा आपल्यावरचा जुलूम कमी होईल. पण हे सर्व साधावयाचे म्हणजे तुम्ही अत्यंत जागृत राहिलेच पाहिजे. अशी एक म्हण आहे की " हिरा पडा है बाट मे कोई ` अंधा निकाल जाय “ आंधळ्याला हिऱयांची जाणीव नसते. तेव्हा ही आलेली संधी तुम्ही फुकट घालवू नका. या देशाच्या राजकारणात कधीही घडलेली नाही अशी गोष्ट घडून येत आहे. या देशात खालच्याने दळावे व वरच्याने भाकरी खावी. वरच्याची चैन तर खालच्याची दैना अशी परिस्थिती आहे. इंग्रजी _ राज्य आले तरी त्यांनी क्रांती घडबून आणली नाही व आपली स्थिती बदलली नाही, ते परके लोक होते. त्यांना आपला राज्यकारभार चालविण्याकरिता या उच्चवर्णीयांची मदत घ्यावी लागत असे. म्हणून त्यांच्या अनुमतीने ते राज्यकारभार चालवीत आणि म्हणूनच आमची परिस्थिती काही बदलली नाही. पण यापुढे नवीन राज्यघटनेत आपलीही सत्ता चालेल. वरचा आणि खालचा असा भेद राहाणार नाही.
आपण कायदे घडवून आणू आपणाला कायदे कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधी मिळाले आहेत. त्यांचे अधिष्ठान कौन्सिलमध्ये होईल आणि मग
त्यांच्या सल्ल्याप्रमाणे सर्व देशाचा राज्यकारभार चालेल. गावात महाराला चावडीत घेत नाही. पण तोच महार लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये जाईल तेव्हा
गावच्या लोकांना अस्पृश्य लोकांबरोबर समानतेने वागणे भागच पडेल.