१८-२-१९३३ दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे करावयाचे ते मनगटाच्या जोरावर करा - Page 431

दैवावर भरवसा ठेवून . .. .. . मनगटाच्या जोरावर करा ३८७

परंतु मला मोठा संशय वाटतो की, या मिळालेल्या शक्‍तीचा तुम्ही योग्य उपयोग कराल किंवा नाही. तुम्ही या गोष्टीची नीट जाणीव ठेवा व तुमच्या हाती आलेल्या शक्‍तीचा विचार करा. तुमच्यामध्ये अंतरपालट होईल असे करू नका व ऐक्य वाढवा. दुही मोडून टाका. पण मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे की, . आपल्यामध्ये दुहीचे व्यसन वाढत आहे. सर्वत्र झगडे चालले आहेत. यामुळे कार्यांचा नाश होत आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण नाशिक जिल्हा व कोकण होय. हे दोन भाग एकमेकाला लागून आहेत. कोकण व नाशिक येथे मोठमोठे सत्याग्रह झाले. ते झाले नसते तर आपल्याला जी राजकीय सत्ता प्राप्त झाली ती झाली नसती. नाशिक सत्याग्रहाने तर इतकी प्रचंड खळबळ उडवून दिली की, मी इंग्लडमध्ये असताना तेथे लंडन टाइम्समध्ये त्याची खबर रोज येत असे. ती वाचून इंग्रज लोक देखील आश्चर्य प्रगट करीत असत. इतकी नाशिक जिल्ह्यातील लोकांनी एकीच्या बळावर कामगिरी बजावली होती. पण मला सांगण्यास फार वाईट वाटते की, तोच नाशिक जिल्हा आज मागे पाय घेत आहे. तेथील लोकांनी जणू काय सार्वजनिक कामाचा संन्यास घेतला आहे. आणि हे कशामुळे होत आहे असे विचाराल तर ते केवळ व्यक्तीद्वेषामुळे. याचे एकच उदाहरण इगतपुरी येथे घडलेले देता येईल. त्या ठिकाणी एकदा अस्पृश्यांची सभा भरली होती, तेथे अध्यक्ष कोणी व्हावे यावरच वाद झाला. शेवटी एका खांबाला अध्यक्ष करून सभा पार पाडावी लागली. अध्यक्ष कोणी व्हावे, सेक्रेटरी कोणी व्हावे, खजिनदार कोणी व्हावे याबद्दलच एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. हीच परिस्थिती जर कायम राहिली तर आपण जो हा एवढा खटाटोप करून अधिकार मिळविले ते सर्व फुकट जातील. समजा उद्या नाशिकला एक प्रतिनिधी मिळाला तर जो स्वार्थत्यागपूर्वक काम करतो त्यालाच तुम्ही निवडून द्या. शहाणा कोण व वेडा कोण याचा विचार करा. पण मानाला हपापलेल्या मूर्खाच्या नादी लागू नका. कोणाच्याही हातून दिवा लागो. पण आपआपसातील दुही मोडा आणि तुमच्या अडचणी नाहीशा करण्याचे ज्ञान प्राप्त करून घ्या. सभातून ठराव पास होतात तिकडे दुर्लक्ष करू नका. अडचणी नाहीशा करण्याचे उपाय शोधून काढा. नारू झाला म्हणून बडबड न करता तो बरा करण्याचे प्रयत्न करा. परिस्थितीचे ज्ञान करून घ्या. ती परिस्थिती तुमच्या घरी येऊन कोणी सांगणार नाही. त्याकरिता ' जनता ' वर्तमान पत्र घेत जा. दुसरी गोष्ट तुम्हाला बजावतो की ' पुणे करार झाला ' तो हिंदूंना मनापासून नापसंत आहे. खरे पाहिले तर हिंदू धर्माचे आपण रक्षण करू शकू. पण हिंदू लोक असे आहेत की ' पुणे कराराचा ' फायदा आपल्या पदरी पडू न देता हिंदू व मुसलमान उद्या कौन्सिलमध्ये एक होऊन आपणाला