१९-२-१९३२ कोकणस्थ-देशस्थ हा भेद मला मान्य नाही - Page 434

३९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कोणीही समंजस माणसास पटेल की हे आक्षेप इतके क्षुद्र आहेत की त्यांचा एखाद्या सार्वजनिक सभेत उल्लेख करावा लागणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु बारीक सारीक प्रश्नासही काही वेळी महत्त्व येते. पहिला आक्षेप म्हणजे कवळ थोतांड आहे. त्यात सत्याचा लवलेश नाही. मला कोकणस्थांशी प्रतारणा करण्याचे काहीच कारण नाही. मी स्वतः कोकण प्रांतातील असलो तरी माझे- जवळ कोकणस्थ-देशस्थ हा भेदभाव नाही. एवढी मात्र गोष्ट खरी की, शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने पाहता कोकणस्थ महार पाठीमागे आहेत व ते या प्रश्‍नाकडे लक्ष देतील तेवढे थोडेच आहे. दुसऱ्या आक्षेपाबद्दल इतकेच सांगावयाचे की ज्याने त्याने आपली योग्यता ओळखावी. रा. जाधवांनी आपली उपयुक्तता पटविली असती तर त्यांना दूर करण्याचे कारण पडले नसते. विद्यार्थ्यांचे वसतीगृह म्हणजे अडत्यामार्फत चालविण्याचे दुकान नव्हे. सुपरिन्टेडेन्टने आपल्या आदर्शपूर्ण आचरणाने विद्यार्थ्यांस शिस्त घालून दिली पाहिजे. त्यांना केवळ शासन करणे हे काही त्यांचे एकच कार्य नव्हे. या अवश्य गोष्टी जाधवांच्या हातून घडत नाहीत हे दिसून आल्यानंतर संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्यांना दूर केल्याशिवाय मार्ग कोणता ? आणि या बोर्डिंगकरता सरकारी ग्रँट मिळते तेव्हा संस्था व्यवस्थेशीर चालविली नाही तर सरकारला जाब द्यावा लागेल. यापुढे ठाणे व महाड येथील वसतिगृहे एका कमिटीमार्फत चालणार आहेत व त्या कमिटीचे सुभेदार सवादकर चेअरमन आहेत. तिसरा आरोप दला संबंधाचा. हे दल vagal झाल्याशिवाय सध्यातरी त्यास शिस्त येणार नाही. चवथा आक्षेप आपल्या चळवळीत ब्राह्मण, कायस्थ, भंडारी वगैरे जातीतील गृहस्थ का असावेत अशा प्रकारचा आहे. मी तुम्हाला या प्रश्‍नाला सरळ साधे थोडक्यात उत्तर देतो म्हणजे ते तुम्हाला सहज पटेल. तुम्ही आजारी पडलात म्हणजे डॉक्टरकडे जाता. त्या वेळेस तो महार नसला तर त्यास तुम्ही टाळता काय ! नाही. मग ही शंका तुमचे मनात का? आजच्या प्रसंगी मला कटू शब्द उच्चारावे लागले याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते; परंतु कटू कर्तव्य म्हणून तसे करणे मला जरूर पडले. असले प्रसंगं न येऊ देणे हे तुमच्या हातात आहे. इतके बोलून बाबासाहेबांनी आपले भाषण संपविले. नंतर अध्यक्षांनी समारोपादाखल एवढेच सांगितले की इतःपर जर कोणी वावदूक गैरसमज पसरवीत आहे असे तुम्हास आढळून आले तर तुम्ही त्यास हात धरून तडक डॉ. बाबासाहेबांकडे घेऊन जा. म्हणजे तुमचा त्याने केलेला गैरसमज दूर होईल. सुभेदार सवादकर, श्री उपशाम, डी.व्ही. प्रधान, कमलाकांत चित्रे, शिवतरकर मास्तर वगैरे मंडळी सभेस हजर होती. आलेल्या मंडळीस पुष्पहार अर्पण करण्यात आले व सभा बरखास्त झाली.