३९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दुसरा प्रतिपक्षाचा पाडाव करून जगतो. पळून जाऊन व दुसऱ्याचे वर्चस्व स्वीकारून जीव जगविणारा मनुष्य काय मिळवितो ? दुसऱ्याचा गुलाम बनतो, स्वत्व विसरून जातो व गुलामांचा तांडा अधिक वृद्धिंगत करतो आणि नामर्दपणाचा फैलाव करतो. यापेक्षा मरणे काय वाईट ? आता हिंदू समाज दुसऱ्यांचा दास किंवा गुलाम होऊनच का राहिला याचा विचार केल्यास, तो आपल्या उद्धारासाठी ' ईश्वराची वाट ' पाहात बसला हेच त्याला कारण आहे, अशी माझी दृढ समजूत आहे.
या जगात ईश्वर असो किंवा नसो त्याचा विचार करण्याची तुम्हास काही जरूरी नाही. एवढी गोष्ट मात्र खरी आहे की जगात ज्या हरघडी घडामोडी होतात त्या माणसेच करीत असतात. काही थोडे सुशिक्षित व स्वार्थपरायण लोक दुसऱ्या असंख्य लोकांना अज्ञानांधकारात ठेवून त्यांना ईश्वराविषयीच्या खोट्या कल्पनांच्या पाठीमागे लावून व त्यांच्या धर्ममोळेपणाचा फायदा घेऊन आपले स्वतःचे हित साधीत असतात. कारण या क्लृप्तीने तुमची संघशक्ती नष्ट होऊन तुम्ही मेंढरासारखे पोकळ भावनांच्या पाठीमागे लागता व तुम्हाला सर्वतोपरी लुबाडण्याचा त्यांचा मार्ग निष्कंटक होतो. आज आपण दीनावस्थेस पोहोचलो आहोत. त्या स्थितीतून बाहेर पडून तुमचा उद्धार करून घ्यावयाचा असेल तर तुम्ही या कल्पनांना अजिबात फाटा दिला पाहिजे. तुम्ही सर्वानी-स्त्रीपुरूषांनी- खात्री बाळगली पाहिजे की तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही , किंवा.तो मीही करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यात आनंद वाटतो की आपल्या वर्गात चळवळीचा वारा चोहीकडे पसरला आहे, पण ही जागृती जरी झाली असली तरी सुद्धा मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे ती ही की यापुढे तुमचे सर्व भवितव्य राजकारणात आहे, दुसऱ्या कशातही नाही. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, काशी, हरिद्वार वगैरे यात्रा करून किंवा शनीमाहात्म्य, शिवलीलामृत, गुरुचरित्र इत्यादि पोथ्यांची पारायणे करून किंवा एकादशी, सोमवार वगैरे उपवास धरून तुमचा उद्धार होणार नाही. तुमचे वाडवडील हजारो वर्षे या गोष्टी करीत आले तरीही तुमच्या शोचनीय स्थितीत एक तसूभर तरी फरक पडला आहे काय ? पूर्वीच्या फाटक्या चिंध्या तुमचे अंगावर, अर्ध्याकच्च्या भाकरीचेच तुकडे अद्याप तुमच्या पोटास, गुराढोरापेक्षाही गलिच्छ अशी आजतागायत तुमची राहणी व कोंबड्याप्रमाणे रोगराईस बळी पडण्याची पूर्वीचीच तुमची निर्बलता, या दुःसह परिस्थितीत अद्याप का बदल झाला नाही ? एकच औषध घेऊन रोग बरा होत नाही तर आपल्याला औषधात फेरबदल करावयास नको का ? वैद्य बदलावयास नको का ? तुमच्या आजपर्यंतच्या वाऱ्या तुमच्या कामी आल्या नाहीत, किंवा तुमचे उपवास जन्माची उपासमारी टाळण्यास समर्थ झाले नाहीत.