२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपल्या भाषणात ते म्हणाले,
ही परिषद अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली
कळकळही देखील तितकीच अपूर्व त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत
असलेली विचारक्रांतिही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते .की, आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्याकारणाने, आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे. ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्त्वांना धरून झालेले दृष्टीस पड़ते. एक जन्मसिद्ध योग्यायोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्रापवित्रता. या दोन तत्त्वानुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात. १. जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो. २. ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग. ३. जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग होय. अशारितीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गावर परिणाम झाला आहे. जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत, तरी पण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांचेजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहेत. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिकदृष्ट्या हिंदुधर्मीयांप्रमाणे त्यांना हक्क नाहोत. त्यांना शाळेत जाता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही, वाहनाचा उपयोग करुन घेता येत नाही इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांना देखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचें तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत, ते त्याना खुले नाहीत. विटाळामुळे गिऱ्हाईक मिळत नसल्याकारणाने त्यांना