३९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सारांश, हे लोक आज आपली पूर्वीची भाषा बदलीत आहेत. हे जे मतपरिवर्तन झाले आहे ते का झाले आहे ? या प्रश्नाचे उत्तर अगदी साधे आहे. आता बहिष्कार पुकारणाऱ्या लोकांना असे वाटू लागले आहे की जर या पुढेही काँग्रेसच्या लोकांनी बहिष्कार तसाच चालू ठेवला तर येणारी सत्ता इतर समाजातील लोक बळकावून बसतील. म्हणून त्यांच्या दृष्टीने नको असलेली सुधारणाही ते स्वीकारण्यास तयार झाले आहेत. सारांश, जे लोक बहिष्काराची घोषणा करीत होते ते देखील स्वहित साधण्यास दक्ष आहेत.
यापुढे हिंदुस्थानात जो लढा चालू राहणार आहे तो ब्रिटिश लोक व हिंदुस्थानातील लोक यांच्यात चालू राहणार नसून हिंदुस्थानातीलच पुढारलेले लोक व मागासलेले लोक यांच्यात चालणार आहे. तुम्ही कदाचित असे म्हणाल की मागासलेला वर्ग बहुसंख्यांक आहे म्हणून त्यास पुढारलेल्या वर्गापासून भीती बाळगण्याचे कांरण नाही. परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की एखादा समाज बहुजन समाज आहे. एवढ्यावरच भागणार नाही तर तो जागृत, सुशिक्षित, स्वाभिमानी असेल तरच त्याचे सामर्थ्य वाढेल. नाहीतर गिरणीच्या मालकाने किंवा एखाद्या श्रीमंत सावकाराने तुम्हास लाचलुचपत दाखविली व त्यासाठी तुम्ही आपली मते त्यांना विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वर्गातील माणसांशिवाय भाडोत्री माणसे तुमच्या समाजाचे कवडीचेही कल्याण करू शकणार नाहीत. आपल्या समाजाला काही तरी वैशिष्ट्य आहे, ही भावना नेहमी जागृत ठेवली पाहिजे. तसेच आपसातील मतभेद दूर करून आपण आपले संघटन वाढविले पाहिजे व परिस्थितीचे ज्ञान करुन घेतले पाहिजे. यासाठी आपल्या समाजातील प्रत्येक माणसाने जनता पत्राचे वर्गणीदार होऊन परिस्थितीचे ज्ञान करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण परिस्थितीचे बरोबर ज्ञान झाल्याशिवाय तुमचा फायदा तुम्हास करून घेता येणार नाही. शेवटी व्हॉलिटिअर समता सैनिक दल बद्दल मला काही सूचना करावयाच्या आहेत. व्हॉलिटिअर म्हणजे आमचा ज्ञानवान व जाणता माणूस आहे, हे मी समजतो. नुसते खाकी रंगाचे कपडे अंगावर घातले म्हणजे लगेच व्हॉलिटिअर होतो असे मी समजत नाही. आपल्या समाजाला सज्ञान करणे हे व्हॉलिंटिअर लोकांचे मुख्य कर्तव्य आहे. अज्ञान समाजाला ' जनता पत्र ' वाचून दाखवून त्यात काय लिहिले आहे हे समजावून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे व ते आपल कर्तव्य बजावतील, अशी मला आशा आहे. आपणा सर्वांचे पुन्हा आभार मानून मी आपली रजा घेतो.
७ ७ ७