२-४-१९३३ स्वतःची लायकी विद्यार्थीदशेतच वाढवा - Page 442

३९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेबांनी त्यांचेपुढील मेजावर असलेली या सम्मेलन सभेची कार्यक्रम पत्रिका वाचून पाहून टाळ्यांच्या कडकडाटात अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले,

हा विद्यार्थी आश्रम पूर्वी आम्ही पनवेल येथे प्रथम स्थापन केला होता. तेथे स्पृश्य समाजापैकी कोणीही आश्रमाला जागा दिली नाही आणि म्हणून एका ' ज्यू ' गृहस्थाच्या घरात त्याची. स्थापना करावी लागली. त्याने देखील पुढे आमची अडवणूक करून घरभाडे चढविण्याचे धोरण ठेविल्याकारणाने तेथून आश्रम ठाण्यास आणाबा लागला आणि येथे देखील नामदार आगाखान यांचा हा बंगला त्यांना समक्ष लिहून आमचे ताब्यात मिळेपर्यंत आश्रमाला जागा मिळण्याचे बाबतीत आम्हाला पुष्कळच त्रास झाला. आणि आता ही जागा मिळाल्यानंतर हा प्रश्‍न साधारणत: सुटला आहे. माझ्या विद्यार्थी बांधवांना मला इतकेच सांगावयाचे आहे की तुम्हाला ही जी व्यवस्था म्हणजे ना. आगाखान यांचा बंगला, सरकारी tre आणि सुपरिन्टेडेंट चांदोरकर आणि त्यांना मदत देणारे दुसरे सहकारी यांची रात्रंदिवस मदत अशा सोई तुम्हाला मिळाल्या आहेत. यापैकी आमच्या लहानपणी आम्हाला काहीच नव्हते. इतक्या सवलती असताना सुद्धा तुमच्याकडून त्यांचा योग्य उपयोग झाला नाही आणि तुम्ही एखाद्या मार्कानिही नापास झालात तर तुम्ही नालायक हा शिक्का संस्थेवर वसवाल आणि सरकार .ग्रॅन्ट काढून घेईल. नवीन हक्क, मोठ्या नोकऱ्या वगैरे मिळावयाच्या तर त्याला स्वतःची लायकी लागत असते. ती लायकी वाढविण्याचे मुख्य काम विद्यार्थी दशेत तुम्ही करीत असताना तुम्ही इतर कोणत्याही चळवळीत पडणे चुकीचे होईल हा दुसरा मुद्दा मला तुम्हापुढे मांडावयाचा आहे आणि तिसरा मुद्दा स्वावलंबन. येथे तुम्हाला पैशाची मदत व्हावी म्हणून गावातील धनिक लोकांना आम्ही मदतीला बोलावू, पण मुख्य मुद्दा तुम्ही तुमचे भाईबन्द, तुमची जात, यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून काय होईल ते होवो ! आम्ही पुढे आल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय करून रोजच्या व्यवहारात तो निश्चय तुम्ही अंमलात आणला पाहिजे तरच काही तरी यश मिळेल आणि या सर्व गोष्टी तुम्ही सर्व जण चांगल्या ध्यानात धराल आणि यशस्वी व्हाल, अशी आशा करून मी माझे भाषण आणखी न लांबविता येथेच पुरे करतो.